अरे व्वा, ओवैसी, थरूर हे निघाले कट्टर देशप्रेमी !

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर नरेंद्र मोदी सरकारने वेगवेगळी प्रतिनिधी मंडळे नेमून त्यांची रवानगी वेगवेगळ्या देशांमध्ये केली. भारताची भूमिका मांडण्याची आणि पाकड्यांचे पोलखोल करण्याची मोठी जबाबदारी या प्रतिनिधींकडे विश्वासाने सोपवण्यात आली. त्यामध्ये विरोधी पक्षांचेही प्रतिनिधी आहेत, हे संपूर्ण देशाला आणि जगाला माहित आहे.
सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी..
या प्रतिनिधी मंडळामध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, उबाठा गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, शशी थरूर, शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याप्रमाणेच ‘ऑल इंडिया मजलिस – ए – इत्तेहादुल मुस्लिमीन’ चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश आहे. यातील काही जण अमेरिका, काही जण युरोपीय राष्ट्रे तर काहीजण आखाती प्रदेशात भारताची बाजू मांडत आहेत.. समजावून देत आहेत!
ओवैसी तर भाजपापेक्षा कट्टर निघाले!
असदुद्दीन ओवैसी मुस्लिम असल्याने पाकचे समर्थन करतील आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यावर पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असल्याने ते भारताच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाहीत, हा भ्रम या दोघांनीही खोडून काढला आहे आणि दोघेही भाजपापेक्षा कट्टर देशप्रेमी निघाले आहेत, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.
विरोधक ते विश्वासू टीमचे नेतृत्व..
वास्तविक, ओवैसी आणि थरूर हे दोघेही भाजपाचे, नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक मानले जातात. परंतु, मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर आणि भारताच्या कारवाईनंतर बाजू मांडण्यासाठी जगभरात जी प्रतिनिधी मंडळे पाठवण्याचे ठरविले होते, त्यातील दोन शिष्टमंडळाचे नेतृत्व अनुक्रमे ओवैसी आणि शशी थरूर करीत आहेत. राष्ट्रहिताच्या कार्यासाठी या दोन्ही मान्यवर खासदारांना जोडून घेण्याची परिपक्क्वता मोदींनी दाखविली. या दोन्ही खासदारांनी या सुसंधीचा लाभ घेऊन, आम्ही राजकीय मतभेद बाजूला ठेवून, भारतमातेची सेवा करण्यास तयार आहोत हे सिद्ध करण्यासाठी या प्रस्तावाला होकार दिला आणि परदेशात जाऊन भारताची बाजू भक्कमपणे लढवत आहेत. पाकड्यांचे वाभाडे काढून त्यांच्या अब्रूची दप्तरे वेशीवर टांगत आहेत, हे एक वैशिष्ट्य !
दहशतवाद पाकने नष्ट करावा..
ओवैसी यांनी बहरीनमध्ये आयोजित सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळाच्या दौर्यात पाकवर अत्यंत जहाल आणि कठोर शब्दात टीका केली. इस्लाम धर्म दहशतवादाचा स्पष्टपणे निषेध करतो, हे त्यांनी अधोरेखित केले आणि पाकने दहशतवादाच्या समर्थनाला पूर्णविराम देऊन दहशतवादी नेटवर्क नष्ट करावीत आणि सीमापार दहशतवादासाठी जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली.
‘जोकर गॅंग’ चा पाकवर ताबा
याशिवाय ओवैसी यांनी पाकला ‘अपयशी राष्ट्र ‘ असे संबोधले. शहाबाज शरीफ यांच्या जोकर गॅंगने पाकवर ताबा मिळवला आहे, असा टोमणा देखील त्यांनी मारला आणि भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या बाबतीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रीय एकतेवर भर दिला.या वक्तव्यांद्वारे ओवैसी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेचा पाठिंबा दर्शविला आणि पाकच्या दहशतवादाच्या समर्थनाविरूद्ध कठोर भूमिका घेतली. या भूमिकेमुळे ओवैसी यांचे संपूर्ण देशात सध्या देशात अभिनंदन आणि कौतुक सुरू आहे!
हेही वाचा – …मी पहाटेचा शपथविधी आणि ७२ तासांचे मुख्यमंत्रीपद विसरू शकत नाही, देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?
थरूर यांचा देशाभिमान आणि स्पष्ट वक्तेपणा
जी बाब ओवैसी यांची, तीच नेमकी काँग्रेसचे शशी थरूर यांची ! न्यू यॉर्क येथील भारतीय वाणिज्य दूतावासात ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भाष्य करताना थरूर यांनी स्पष्ट केले, की हे ‘ऑपरेशन सिंदूर’ पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने हाती घेतले आणि कारवाई केली. ‘तुम्ही सुरू केले, आम्ही उत्तर दिले’ हा स्पष्ट संदेश देण्याचा भारताचा हेतू होता. ‘कोणीही असा गैरसमज करून घेऊ नये, की ते सहजपणे सीमारेषा ओलांडून भारतीय नागरिकांना ठार मारू शकतात आणि त्यातून ते वाचतील. आता त्याची किंमत मोजावीच लागेल.
तुम्ही थांबलात तर आम्ही थांबू..
तुम्ही थांबलात, तर आम्हीही थांबू आणि ते थांबले. ही कारवाई केवळ ८८ तास चालली. आम्ही या प्रसंगाकडे आम्ही मोठी खंत म्हणून पाहतो, कारण ही परिस्थिती उद्भवलीच नसती, तरी चालले असते. अनेक जीव गेले. पण, या अनुभवातून आम्हाला नवी जिद्द व निर्धार मिळाला आहे. भारताला पाकशी युद्ध करण्यात कोणतेही स्वारस्य नाही. भारत फक्त आपल्या विकासावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. भारताला पाकचे काहीही नको, असे सांगत त्यांनी भारताला ‘स्थितीशील’ आणि पाकला ‘ परिवर्तनवादी शक्ती’ असे संबोधले. थरूर यांच्या बोलण्यातून देशाविषयीचे प्रेम आणि जाज्वल्य स्वाभिमान दिसत होता.
परिपक्व राजनीतिज्ञ नेत्याचा वस्तुपाठ..
आता एक अंतिम सीमा ठरवणे गरजेचे आहे असे सांगत थरूर यांनी नमूद केले, की भारताने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीकडे तक्रारी, राजनैतिक प्रयत्न यासारख्या सर्व मार्गाचा अवलंब केला आहे. तरीही पाकने दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा अथवा दहशतवादी अड्डे नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. थरूर यांनी अमेरिकेत पत्रकारांसमोर केलेले भाषण हे एका परिपक्व राजनीतीज्ञ व्यक्तीने आपल्या देशाची भूमिका जगासमोर किती उत्कृष्ट शब्दात मांडावी, याचा एक वस्तूपाठ आहे. हे भाषण ऐकून पाश्चात्य मीडियाला वास्तवाचे भान येईल, याची खात्री आहे. थरूर म्हणाले की,मी विरोधी पक्षात आहे, तरीही मी पहलगाम हल्ल्यानंतर एक लेख लिहिला होता. आता वेळ आली आहे, जोरदार आणि हुशारीने प्रत्युत्तर देण्याची!त्यांनी भारताच्या अचूक कारवाईचे कौतुक केले आणि सांगितले, की हा हल्ला दीर्घकाळ चालणार्या युद्धाची सुरूवात नव्हती, तर केवळ प्रत्युत्तर होते.
भारतीय लोकशाहीची परिपक्वता..
थोडक्यात सांगायचे झाले, तर ओवैसी आणि थरूर यांनी जागतिक पातळीवर भारतीय लोकशाही किती परिपक्व आहे आणि राष्ट्रीयहिताच्या मुद्द्यावर भारतातील सर्व राजकीय पक्ष एकजूट आहेत, असा महत्वाचा संदेश दिला आहे आणि त्यासाठी या दोघांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करणे अत्यंत आवश्यक आहे. तमाम भारतीयांच्या मनातसुद्धा अभिनंदनाची नक्कीच भावना येऊन गेली असेल.
जनतेच्या मनातील भ्रम..
भारताच्या भूमिकेला ओवैसी आणि थरूर पाठिंबा देणार नाहीत, हा भ्रम या दोघांनी खोडून काढला आणि संस्कार काहीही असले तरी अंतर्मनाने ते सच्चे भारतीय आहेत, हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी खर्या अर्थाने भारतमातेचे सुपुत्र म्हणून काम केले आहे.
मोदींचे काम हलके केले..
ओवैसी आणि थरूर यांनी नरेंद्र मोदी यांचे काम अगदीच हलके करून टाकले. जागतिक समुदायापुढे भारताची कठोर भूमिका मांडताना आपण विरोधक असलो तरी भारतभूमी ही आमच्या प्राणापेक्षा प्रिय आहे, हाच संदेश त्यांनी जगाला दिला. देशप्रेमी मागे अशीच भूमिका देशातील विरोधकांनी कायम ठेवली, तर भारतामध्ये सुवर्णयोग अवतरायला वेळ लागणार नाही, हे मात्र नक्की !