राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळ फासू : बाळा दराडे
सावरकरांबद्दलच्या वक्तव्यामुळे हा संघर्ष निर्माण

महाराष्ट्र : राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळ फासू, ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी हा इशारा दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही असंही दराडे म्हणाले आहेत. मविआ गेली खड्ड्यात, (आमच्यासाठी) आधी सावरकर आणि हिंदुत्व असं वक्तव्यही दराडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले दराडे ?
राहुल गांधी यांनी दोनवेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्यांन माफीवीर म्हणून संबोधलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना ठाकरी शैलीमध्ये सुनावलं होतं. पण आता नाशिकमधील ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यांना समन्सही बजावण्यात आला आहे. राहुल गांधी हे जर नाशिकमध्ये आले तर आम्ही आमच्या ठाकरी शैलीमध्ये, शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यालवर दगडफेक करू. आणि त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, असा थेट इशारा दराडे यांनी दिला. सावकरांबद्दल केलेलं कोणतंही वक्तव्य खपवून घेणाप नाही, असंही दराडे म्हणाले.
हेही वाचा – निर्मला गवित यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत प्रवेश
महाविकास आघाडी नंतर, मविआ गेली खड्ड्यात, आधी सावरकर आणि हिंदुत्व , अशी भूमिकाही दराडे यांनी मांडली आहे. माध्यमांसमोर भूमिका मांडताना दराडे यांनी राहुल गांधींना हा इशारा दिला.
बाळा दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे उपमहानगर प्रमुख आहेत. काँग्रेस नेते, राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल सातत्याने जी वक्तव्य करत आहेत, ती आम्ही खपवून घेणार नाही. आमच्यासाठी हिंदुत्व आणि सावरकर आधी येतात, असा पुनरुच्चार दराडे यांनी केला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आता चांगलेच आक्रमक झालेले दिसत असून याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.