नागरी समस्यांबाबत पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने पुढाकार घ्यावा!
सोसायटीधारकांच्या ११ प्रमुख नागरी प्रश्नांवर पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा पुढाकार

– नागरिकांच्या प्रश्नांवर सामूहिक लढ्याची हाक; १२८ नगरसेवकांना सादर केले १०० पानी अभ्यासपूर्ण दस्तऐवज
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना भेडसावणाऱ्या ११ प्रमुख नागरी समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात, यासाठी पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनने शहरातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनने शहरातील महत्त्वाच्या नागरी प्रश्नांचा सखोल अभ्यास करून सुमारे १०० पानी सर्वसमावेशक दस्तऐवज तयार केला आहे. या दस्तऐवजात प्रत्येक समस्येची मूळ कारणे, संबंधित कायदेशीर तरतुदी, व्यावहारिक उपाययोजना तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मांडता येईल, असे ठरावाचे भाषणही तयार करून देण्यात आले आहे. हा संपूर्ण दस्तऐवज महापालिकेतील सर्व १२८ नगरसेवकांना सादर करण्यात आल्याची माहिती फेडरेशनने दिली.
या उपक्रमाला व्यापक लोकसहभाग मिळावा, यासाठी शहरातील प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेने पुढील प्रक्रिया तातडीने राबवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित दस्तऐवजाची प्रत काढून संस्थेच्या अधिकृत लेटरहेडवर आच्छादनपत्र (कव्हरिंग लेटर) जोडावे. त्यानंतर स्थानिक नगरसेवकांची प्रत्यक्ष भेट घेऊन हे निवेदन सादर करावे. तसेच या ११ प्रमुख प्रश्नांवरील ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडून मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती नगरसेवकांना करावी, असेही फेडरेशनने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध!


पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या मते, एका गृहनिर्माण संस्थेचे निवेदन दुर्लक्षित होण्याची शक्यता असते; मात्र शेकडो गृहनिर्माण संस्था एकाच विषयावर एकत्रितपणे निवेदने सादर करतील, तेव्हा तो नागरिकांचा सामूहिक आवाज ठरेल आणि प्रशासनालाही त्याची दखल घ्यावी लागेल. हा उपक्रम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, शहरातील नागरी सुविधा, पायाभूत विकास, सार्वजनिक सेवा, सुशासन आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असल्याचे पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनने स्पष्ट केले आहे.
“आजचा आपला सहभाग उद्याच्या समस्या सोडविण्याचा पाया ठरेल,” असा विश्वास व्यक्त करत पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनने शहरातील सर्व गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या स्थानिक नगरसेवकांकडे निवेदन सादर करावे, असे आवाहन केले आहे. सामूहिक प्रयत्नांतूनच पिंपरी-चिंचवड अधिक स्वच्छ, सुरक्षित, सक्षम आणि नागरिक-केंद्रित शहर म्हणून विकसित होईल, असा विश्वासही फेडरेशनने व्यक्त केला आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न केवळ एका सोसायटीचे नसून संपूर्ण शहराचे आहेत. त्यामुळे प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने आपल्या स्थानिक नगरसेवकांपर्यंत हा १०० पानी अभ्यासपूर्ण दस्तऐवज पोहोचवून त्यावरील ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्याची मागणी करावी. शेकडो सोसायट्यांचा एकसमान आवाज प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना निर्णय घेण्यास भाग पाडेल. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा उपक्रम नसून शहराच्या विकासासाठी, सक्षम नागरी सुविधा आणि नागरिकांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली लोकचळवळ आहे. प्रत्येक सोसायटीने या अभियानात सहभागी होऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आमचे आवाहन आहे.”
– सचिन लोंढे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.





