‘NCP’ त अंतर्गत कलह? सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवर आक्षेप

पुणे | राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, त्यांच्या पदाविरोधात आता पक्षाकडून आव्हान देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सचिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष पदाविरोधात नोटीस बजावली आहे. २६ फेब्रुवारी रोजी झालेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अवैध असल्याचा दावा सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे.
“मी सुनेत्रा पवारांना पक्षाचे प्रमुख मानतो. पण राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जी निवडणूक झाली ती पक्षाच्या विधिसंमत झाली नाही. पक्षाच्या घटनेविरोधात ही निवडणूक झाली. या निवडणुकीत काही त्रुटी राहिल्या आहेत, त्यामुळे भविष्यात पक्षात काही अडचण येऊ नये म्हणून या चुकीला सुधारण्याचं आवाहन करत आहे. याआधी मी पक्षातील नेतृत्वाला पत्र लिहून याबाबत माहिती दिली होती. मी अधिवेशनाला आलो आहे, पण निवडणुकीची पद्धत योग्य नसल्याचं म्हटलं होतं. पण या पत्राला तीन महिन्यांनंतरही उत्तर देण्यात आलं नाही, त्यामुळो कायदेशीर नोटीस बजावली”, असं सचिदानंद सिंह म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “पक्षाचं निवडणूक चिन्ह सर्वोच्च न्यायालयात वादातीत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आपल्यावर काही कारवाई होऊ नये, याकरता त्याआधीच मी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना नोटीस बजावली आहे.”
हेही वाचा
मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत!
“मी आधी पत्र लिहून आग्रह केला होता की ही अध्यक्ष पदासाठी झालेली बैठक योग्य नाही. कारण, त्याआधी सीडब्लूसीची बैठकच झाली नाही. मुंबईच्या अधिवेशनात जी घटना मान्य केली ती निवडणूक आयोगाला पाठवलीच नाही. कलम २९ चा दुरुपयोग झाला आहे. अशा परिस्थितीत मी यात सुधारणा करण्याचं आवाहन केलं होतं. पण त्या पत्रावर काहीही उत्तर आलं नाही. ते पत्र नाकारण्यात आल्याचंही कळवलं नाही. पत्राला उत्तर न मिळाल्याने मी पक्षाचा माजी राष्ट्रीय सचिव या नात्याने मी नोटीस बजावली आहे”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
“पक्षातील त्रुटींचा पक्षातील बाहेरील व्यक्तीने गैरफायदा घेऊ नये म्हणून मी ही नोटीस बजावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्याशीही सातत्याने चर्चा करत होतो. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडूनही देण्यात आलं नाही. त्यामुळे मी कायदेशीर पाऊल उचललं आहे”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.





