…मी पहाटेचा शपथविधी आणि ७२ तासांचे मुख्यमंत्रीपद विसरू शकत नाही, देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?

मुंबई : ‘मी दुसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, असा उल्लेख करण्यात आला. मात्र मी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो आहे, ही गोष्ट तुम्ही विसरले. मात्र मी पहाटेचा शपथविधी आणि माझे ७२ तासांचे मुख्यमंत्रीपद कधीच विसरू शकत नाही, याची तुम्हाला आठवण करून देतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’ येथे पार पडलेल्या ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – एन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजेच ‘एनसीपीए’च्या ‘पेज टू स्टेज’ उपक्रमाअंतर्गत तसेच सोशल स्टडीज फाउंडेशनतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – एन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, २८ मे रोजी नरिमन पॉईंट येथील ‘एनसीपीए’मधील टाटा सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परिचय करून देताना ते दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर स्वतःचे मनोगत व्यक्त करीत असताना मी पहाटेचा शपथविधी आणि ७२ तासांचे मुख्यमंत्रीपद विसरू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
हेही वाचा – जो त्या वकिलाच्या चार कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार; कुटुंबीयांनी आरोप फेटाळले; खडसेही संतापल्या
‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – एन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तकाचे लेखन व संपादन ज्येष्ठ पत्रकार व लेखक अंबरीश मिश्र यांनी केले असून हिंदी अनुवाद सत्यप्रकाश मिश्र यांनी केला आहे. हे पुस्तक इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांचे जीवनकार्य व शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – एन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तकाच्या प्रती विकत घेऊन भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र व मध्यप्रदेशचे सर्व मंत्री आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांना देणार आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित एक भव्य आणि चांगला व्यावसायिक चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.