नांदेड जिल्ह्यातील गोदावरीसह इतर नद्यांमुळे ३३७ गावांना पुराचा धोका
नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत
नांदेड : जिल्ह्यात गोदावरी नदी आणि इतर लहान-मोठ्या नद्या असून, भरपूर पाऊस झाल्यास जवळपास ३३७ गावांना पुरांचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मॉन्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेऊन मॉन्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
मॉन्सून-२०२५ च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झाली. बैठकीस मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कुऱ्हे यांच्यासह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महापालिका, आरोग्य, कृषी, महसूल विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मृद व जलसंधारण, विद्युत, पोलिस, अग्निशमन, शिक्षण, पशुसंवर्धन, रेल्वे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
स्थलांतर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था
शहरातील नाल्याची स्वच्छता करून घ्यावी. गावांना धोका होऊ नये, यादृष्टीने पाझर तलावाची दुरुस्ती करून गाळ काढावा. शहरातील धोकादायक इमारतीची पाहणी करून नोटीस देत कारवाई करावी. पूर परिस्थितीत नदी काठच्या लोकांचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. सुरक्षित स्थळे निश्चित करावीत, अशा उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.
नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवा
२४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करून कक्षातील कर्मचाऱ्यांचे मोबाइल क्रमांक अद्यावत करावेत, अशा सूचना केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी या केल्या सूचना
जिल्ह्यातील पूरग्रस्त ३३७ गावांत रंगीत तालीम घ्यावी.
आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणाची आवश्यक साहित्यांची खरेदी करावी.
जिल्हा परिषदेत १०१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; ग्रामपंचायत विभागात सर्वाधिक ८० बदल्यांचा समावेश
वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहतील यांचे नियोजन करावे.
आदिवासी व ग्रामीण भागात सर्पदंशासह इतर आजारांवरील उपचार स्थानिक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातच करावेत.
आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करावी.
साथीच्या रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलक औषधी, रक्तसाठा, त्या अनुषंगिक साहित्य उपलब्ध करावीत. -ब्लिचिंग पावडरची साठवणू सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा.





