महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, आज (१३ मे) मुंबई, पुणे, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.
मुंबई आणि ठाण्यासह दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज आणि उद्या (१३-१४ मे) साठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, विलेपार्ले आणि सांताक्रुझ परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा : संस्मरणीय: तब्बल 25 वर्षानंतर माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह मेळावा
पुणे, कोल्हापूर, सातारा यांना ऑरेंज अलर्ट
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड आणि धाराशिव यांच्या घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: पुणे आणि घाटमाथ्यावर गारपिटीचाही धोका आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोकण-गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत (१३-१४ मे) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांसाठी १४ आणि १५ मे साठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह (४०-५० किमी प्रतितास) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.