ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

मोदी द्वेषाने पछाडलेले, राजकारणी अन् मीडिया!

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर संपूर्ण देशातील वातावरण बदलले आहे. भारतीय जवानांनी आणि भारतीय सुरक्षा दलांनी जे शौर्य गाजवले, त्यावर भारतातील जनता खुश आहे. नतद्रष्ट दहशतवादी आणि भंपक पाकिस्तान यांचे संकट आले तरीही भारत त्यांना सडेतोड उत्तर देऊ शकतो, याची खात्री जनतेला पटली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे, अशी ग्वाही देखील दिली जात आहे.

कपाळकरंट्यांना काय म्हणावे?

चारही बाजूंनी नरेंद्र मोदी यांची होत असलेली वाहवा, यांच्याबाबत निघत असलेले गौरवॊद्गार सहन न होणारे शेकडो मोदी द्वेष्टे आपल्या देशात असून त्यांची टकळी आणखी जोमाने सुरू झाली आहे. अशा कपाळकरंट्या राजकारण्यांना आणि मीडियाला काय म्हणावे ? हे सुचेनासे झाले आहे. बरं, अशा मोदी द्वेष्टयांना समाज हिंगलत सुद्धा नाही, किंवा त्यांची समाजात किंमत शून्य असते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, पण रोज खालच्या थरावरील टीका करायची, हा त्यांचा नित्याचा उद्योग झाला आहे.

आमचा ‘अति हुशार’ मीडिया..

महाराष्ट्रात बहुसंख्य पत्रकार आणि वृत्तवाहिनीवाले मोदींचा वैयक्तिक द्वेष करतात, हे जग जाहीर आहे. त्यामागील कारण माहीत नाही. कदाचित, काँग्रेस शासनाची, प्रत्येक गोष्ट मीडियाला विचारून करण्याची सवय असल्यामुळे हे होत असावे. मोदी यांनी २०१४ मध्ये भाजपाला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळवून दिले, हे वास्तव अनेकांना स्वीकारणे कठीण झाले. नंतर २०१९ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत अशी अटकळ आणि इच्छा अनेकांना होती.. पण तीही फोल ठरली! मीडियाचे लाडके ज्येष्ठ नेते शरद पवार यांना असे वाटत होते की, भाजपला दोनशेच्या आसपास जागा मिळतील आणि मोदी कमकुवत होतील. तेव्हा नितीन गडकरी किंवा राजनाथसिंह यांचे नाव पंतप्रधान म्हणून अनेकांच्या मनात रुंजी घालत होते. ती अटकळही बारामतीच्या कऱ्हा नदीमध्ये वाहून गेली.

दुसऱ्यांदा मोदी, हे अनेकांना खुपले..

नरेंद्र मोदी दुसऱ्या वेळी पंतप्रधान झाले, ते अनेकांना खुपले आणि त्यांचा मानसिक आजार बळावत गेला. त्यांचा द्वेष करण्याचे मुख्य कारण म्हणजे ते पोषाख उत्तम पद्धतीने करतात. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना नीटनेटके रहायला आवडते. पण, त्या संदर्भात देखील खूप लोकांना असूया वाटते. २०२४ मध्ये तरी मोदी सत्तेवरुन खाली खेचले जातील, अशी आशा बाळगणारे अनेक ‘भटकंती आत्मे’ देशभर फिरत होते. राजकीय पक्षांच्या लोकांची भूमिका समजू शकतो. पण, कारण नसताना मोदींना पाण्यात बघणारा एक मोठा वर्ग आहे आणि या वर्गातील अनेक लोक आता पासष्टी, सत्तरी ओलांडलेले आहेत. फारसा अभ्यास नाही, वाचन नाही, संदर्भ नाहीत, फक्त दुस्वास करीत राहण्याची अनेकांना सवय लागली आहे आणि हळूहळू त्याचे रूपांतर मनोविकृतीकडे होत आहे.

अफलातून कार्यपद्धतीचे रसायन..

नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि परिस्थिती हाताळण्याची कला ही प्रत्येकाला भुरळ पाडणारी आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची घसरण झाली आणि २४० जागांवर येऊन देखील मोदी यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सरकार स्थापन केले आणि ते आता स्थिरावले आहे. मनोविकृतांचा तो आजारी समूह चंद्राबाबू नायडू आणि नीतीशकुमार मोदींना कधीही टांग मारतील, अशी अपेक्षा बाळगून होता. या वर्गाला असे वाटत होते की, सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन मोदींना सत्तेच्या बाहेर खेचतील आणि देशाच्या राजकारणात काहीतरी अद्भुत घडेल ! पण मोदी हे रसायन वेगळे आहे.

सत्तेची तयारी ३५ वर्षांपूर्वी..

तीस-पस्तीस वर्षे मागे गेलो, तर मोदी यांनी भाजपची सत्ता आणण्याची तयारी १९८९ मध्ये सुरु केली होती. त्या आधी म्हणजे १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर गांधीवादी समाजवादाचे भूत भाजपच्या मानगुटीवर बसले होते. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये मोदींनी ते उतरवले. १९८६ मध्ये श्री रामजन्मभूमी आंदोलन सुरु झाले, तेव्हा मोदींनी ओळखले होते की भाजपची एकट्याची सत्ता आणायची असेल तर ‘युती’ वगैरे सगळे खोटे आहे. तेव्हा जनता दल होते आणि गुजरातमध्ये जनता दलाने १३ आणि भाजपने १२ जागा लढवल्या होत्या. मोदी आपण स्वतंत्र लढू म्हणत होते. पण ‘युती’ झाली. भाजपने लढवलेल्या सगळ्या जागा जिंकल्या. जनता दलाचे तीन उमेदवार पराभूत झाले. आता गुजरातमध्ये जनता दल नावाला शिल्लक नाही, हे लक्षात घ्यायला हवे !

भव्य – दिव्य न आवडणारी जनता !

थोडक्यात काय, नरेंद्र मोदी यांची कोणतेही काम भव्य आणि व्यापक पद्धतीने करण्याची पद्धत अनेकांना आवडत नाही. पूर्वी, भाजपच्या किंवा त्या आधी जनसंघाच्या कार्यालयात चहा मिळाला तरी पुष्कळ, पण मोदी यांचे आगमन झाल्यानंतर ही परिस्थिती बदलली. दिल्लीत भाजपचे भव्य कार्यालय आहे. तिथे आता पाहुण्यांना किंवा कार्यकर्त्यांना पाहिजे ते अन्नपदार्थ सहजपणे उपलब्ध आहेत.

हेही वाचा   :    पुणे-पिंपरी-चिंचवडकरांसाठी फॅशन, फन, फूड-सगळं एकाच ठिकाणी!

नवे नेतृत्व, नवा भारत सहन होत नाही..

नरेंद्र मोदी आल्यापासून हे सगळे नियोजन वगैरे ज्यांनी कधी अनुभवले नसावे, त्यांना अनेक गोष्टी सहन होत नाहीत. काँग्रेसच्या काळातील त्याच रटाळ गोष्टी पुढे सुरु राहाव्यात, असे ज्यांना वाटत असते, ते लोक मोदींना पाण्यात बघतात.. मोदींचा दुस्वास करतात. पूर्वीच्या पारंपारिक पद्धतीमध्ये गुरफटलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना म्हणूनच मोदी नको असतात. एखाद्या बँकेच्या शाखेत फर्निचर बदलायचे ठरवले तरी जुने कर्मचारी लगेच विरोध करतात, कारण त्यांना लाकडी फर्निचर मधील ढेकणांची सवय झालेली असते. टेबल हलवले आणि झुरळे भेदरून बाहेर पडली, तरी त्यांना कसेतरी होते. काँग्रेस सरकारची ज्यांना सवय झाली होती गेल्या दहा वर्षांत झालेला बदल असह्य होतो आणि तो कुठेतरी प्रकट होतो.

पारावर गप्पा मारणारी जुनी विचारसरणी..

खेड्यापाड्यात पारावर बसणारे किंवा पुण्यातील पर्वतीच्या जवळपास एखाद्या हॉटेलमध्ये बसून निरूद्योगी लोक ट्रंप ने असे करायला पाहिजे, मोदींनी तसे करायला पाहिजे, नरेंद्र मोदी चुकलेच, वगैरे बोलत असतात, त्याचीच ही पुढची आवृत्ती म्हणा ना ! काँग्रेस हा देशातील एक प्रमुख पक्ष आहे, पण मिसळ विकणारे एखादे दुकान म्हणजे नवी पिढी काळाबरोबर बदलते, पण, काँग्रेस पक्ष काही सुधारेल असे वाटत नाही. शिवाय अन्य कोणताही राजकीय पर्याय राष्ट्रीय पातळीवर समोर दिसत नाही. त्याचा परिणाम मोदींना पाण्यात बघणाऱ्या लोकांवर हरप्रकारे होतो आहे, हे जाणवते.

नरेंद्र मोदी आगे बढो..

भारतातील हतबल झालेली काँग्रेस, भाजपा आणि संघ परिवारातील जुनी विचारसरणी त्याचप्रमाणे समाजामध्ये शून्य किंमत झालेला मीडिया यांच्या तोंडून आणि कृतीतून मोदी द्वेष ओसंडून वाहत आहे. पण, मोदींना संपूर्ण देशात पाठिंबा वाढतो आहे, आणि पुढील दहा वर्षे सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष हा विरोधकांचा सुपडा साफ करणार आहे, हे नक्की !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button