मुस्लिमांनो, मुख्य प्रवाहात या.. संघाच्या चक्क हिरव्या पायघड्या !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्वी एवढा आता कडवा राहिलेला नाही. पूर्वीसारखे संघाचे हिंदुत्व देखील कट्टर राहिलेले नाही, हे मान्यच करावे लागेल. विशेषतः गेल्या काही दिवसात मुस्लिम समाजाबाबत संघातील ज्येष्ठ नेते जे काही बोलत असतात, त्याचे दूरगामी परिणाम दिसत आहेत. आता तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट मुस्लिमांनाच आवाहन केले असून मुख्य प्रवाहात येण्याबाबत हिरव्या पायघड्याचं घातल्या आहेत, असे म्हणायला हरकत नाही.
संघाची पावले विचारपूर्वकच !
सरसंघचालक मोहन भागवत जेव्हा एखादा मुद्दा मांडतात, तेव्हा तो विचारपूर्वक आणि संघाच्या ‘कोअर ग्रुप’ मध्ये झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर तसेच विचार मंथनानंतरच मांडलेला असतो. आता तर, त्यांनी मुस्लिमांना बरोबर घेऊन राष्ट्र निर्मिती करा, असा मुद्दा मांडला आहे. संघाने एखादे पाऊल उचलले तर त्याकडे डोमकावळ्यासारखे लक्ष ठेवून बसलेले विरोधक खाडकन जागे होतात आणि टीकास्त्र सोडतात. संघावर टीका करण्याची एकही संधी सोडायची नसते, एवढीच त्यांना त्यांच्या संघटनांची शिकवण असते..प्रत्यक्षात त्याचा संघावर शून्य परिणाम झालेला असतो.
सोशल मीडिया एकदम सक्रिय..
सरसंघचालकांचे शब्द बाहेर पडताक्षणी लगेचच सोशल मीडियावर स्वतःला हिंदुत्वाचे कैवारी समजणारे काही फेसबुकी हिंदू लगेचच त्यावर टोकाच्या विरोधी व वेड्यावाकड्या कॉमेंट टाकून मोकळे झाले. हिंदूंचे हित फक्त आपल्यालाच कळते, असा त्यांचा समज असावा. त्यांच्या भावनांचा आदर ठेवून त्यांच्या विचारार्थ माझ्या आकलनातील काही मुद्दे देत आहे. सर्व हिंदू बांधवानी जरूर वाचावेत आणि बिनधास्तपणे आपली मते नोंदविण्यास हरकत नाही.
हेही वाचा – ‘इलेक्ट्रिक सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप’मध्ये पीसीसीओई अव्वल
कोण म्हणतं सर्व मुस्लिम वाईट..
सर्व मुस्लिम समाज वाईट आहे, हा समज तद्दन खोटा आहे. वास्तव असे आहे, की सर्वसामान्य मुस्लिमांना भीती दाखवून आणि धार्मिक कट्टरता वाढवून,विशिष्ट मौलवी आणि राजकीय नेते आपल्या दबावाखाली ठेवत आले आहेत तसेच कायम ठेवू पाहात आहेत. त्यांना प्रचंड जबरदस्ती करून हिंदू विरोधी बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मुस्लिमांचे तुष्टीकरण मतांसाठी !
मतांच्या फायद्यासाठी काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि महाराष्ट्रापुरते बोलायचे तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे गट, असे पक्ष या मौलाविना पूर्ण पाठिंबा देत आहेत. पण, त्यांच्या वागण्यातील विसंगती सर्वांच्या लक्षात येत आहे. त्यांची चाललेली तारेवरील कसरत ही फक्त मुस्लिमांच्या मतावर डोळा ठेवून आहे हे कोणाही कार्यकर्त्याच्या पटकन लक्षात येत आहे.
काँग्रेसच्या काळातील चुकांची दुरुस्ती
पूर्वीच्या काँग्रेसच्या काळातील चुका पंतप्रधान नरेंद्र मोदी दुरुस्त करत आहेत. उदाहरणच द्यायचे तर तिहेरी तलाक, वक्फ बोर्डाचा कायदा ! त्याची जाणीव गोरगरीब सामान्य मुस्लिम, आणि त्यातही विशेष करून मुस्लिम महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मोदींच्या योजनांचा फायदा मुस्लिमांना..
मोदींच्या विकासकामांचा फायदा सर्वसामान्य मुस्लिमांना मिळतो आणि कळतो आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कानोसा घेतला तर मुस्लिम मतदार सध्या संभ्रमात आहे. पण, हळूहळू भाजपा कडे वळत आहे. भाजपाच्या सरकारने उचललेल्या पावलांचे तो स्वागतही करीत आहे.
विकसित राष्ट्राच्या दिशेने..
आपल्या देशाला जर प्रगत देश म्हणजेच विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर ८० विरुद्धध वीस टक्के असा संघर्ष सुरु ठेवून ते शक्य होणार नाही. त्यासाठी देशांतर्गत पूर्ण एकी नाही, तरी सर्वसामान्य शांततेची परिस्थिती निर्माण करावीच लागेल. त्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांची जशी नुकतीच भेट झाली, तशा भेटीतून धोरणे ठरत असतात आणि देशात तशी वातावरण निर्मिती केली जाते.. तशी पावले टाकली जातात.
‘सौगात-ए-मोदी’ चा धडाका..
यासाठी नुकत्याच झालेल्या ‘सौगात-ए-मोदी’ या बत्तीस लाख गरीब मुस्लिम बांधवांच्या घरी पोहचवण्यात आलेल्या भेटीचा संदर्भ लक्षात घ्या म्हणजे परिस्थिती लक्षात येईल. काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरण मॉडेल मध्ये मुस्लिम धर्मगुरु आणि प्रस्थापित मुस्लिम नेते केंद्रस्थानी होते. संघ आणि भाजपा च्या मुस्लिम सलोखा मॉडेल मध्ये सामान्य गरीब बांधव केंद्रस्थानी आहेत. फरक तर पडणारच आहे. त्यामुळे मुस्लिम समाज हा भाजपाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे आणि हेच मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षित आहे.
संघर्ष नको, शांतता हवी !
आजच्या परिस्थितीत जमिनीवरच्या संघर्षाने जे शक्य होणार नाही, ते या प्रयत्नातून होईल, असा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास आहे. शेवटी हा पण एक प्रयत्न आहे, हे लक्षात ठेवायलाच हवे आणि येणारा काळच त्याचे यश ठरवणार आहे.
साप साप करत भुई थोपटू नका..
सर्वसामान्य हिंदूंनी त्याला उगाचच विरोध न करता त्यात जमले तर सहकार्य द्यावे. अन्य हिंदूंचा बुद्धीभेद होईल, असा आक्रस्तळेपणा मुळीच करू नये. सर्वसामान्यांची बुद्धी ज्या ठिकाणी थांबते, त्यापुढे भागवत आणि मोदीही यांचे बुद्धी आणि नियोजन सुरू होते, हे लक्षात ठेवा. शिवाय कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी पाठीमागे मोठाच्या मोठा ‘थिंक टॅंक’ बसलेला असतो हे सगळ्यांना माहीत आहेच!