Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही शेतीच्या परिवर्तनाची जनचळवळ : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून, महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित ‘फार्मर कप २०२६’चा प्रारंभ करण्यात आला. या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान, अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी या वेळी उपस्थित होते. झूम लिंकद्वारे राज्यातील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी स्मार्ट शेती ॲपचे लोकार्पण करण्यात आले.

‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वासच भविष्यातील कृषी परिवर्तनाचा पाया ठरेल. फार्मर कपमधील १८ हजार शेतकरी गट हे महाराष्ट्रातील शेती क्रांतीचे शिल्पकार ठरणार आहेत, त्यांच्या अनुभवातून लाखो शेतकरी प्रेरणा घेतील. विधानमंडळात महिला शेतकरी विधेयक मंजूर करण्यात येणार आहे. शेतीच्या मालकीमध्ये नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता दिली जाणार आहे. मागील वर्षी फार्मर कपमध्ये सहभागी झालेल्या गटांमध्ये सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांच्या उत्पादनात सरासरी ७१ टक्क्यांनी वाढ झाली. सामूहिक खरेदीमुळे कृषी निविष्ठांवर १,५८४ कोटी रुपयांची बचत झाली, तर सामूहिक श्रमांमुळे एकरी सुमारे ६ हजार रुपयांची मजुरीची बचत झाली. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा –  ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी’; पालकमंत्री संजय राठोड

महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरत आहे. महाविस्तार ॲप आणि फार्मर कपमधील माहिती एकत्रित करून शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन करण्यात येईल. फार्मर कपमधून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे राज्याच्या कृषी धोरणांमध्येही आवश्यक बदल करण्यात येतील. राज्य शासनाच्या विविध योजनांचे एकत्रित नियोजन (कन्व्हर्जन्स) केल्यास गटशेती अधिक सक्षम होईल. या वर्षी एल निनोमुळे पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व संरचनांची तातडीने दुरुस्ती, गाळ काढणे आणि पाणीसाठा वाढविण्याची कामे हाती घ्यावीत, जलयुक्त शिवारसारख्या उपक्रमांमुळे पूर्वीच्या दुष्काळी परिस्थितीत मोठा दिलासा मिळाला होता, असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री स्वतः भेट देणार

फार्मर कपमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी गटांच्या गावांना स्वतः भेट देणार आहेत. शेतीचा विकास हे राज्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असले तरी शासन, पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे काम केल्यास पुढील पाच ते सात वर्षांत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रामध्ये ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणता येईल. प्रत्येक सहभागी शेतकरी हा आधीच विजेता असून, ही चळवळ राज्यातील कृषी समृद्धीचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button