Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘संघर्ष’ हाच भाजपाचा ‘डीएनए’ : आमदार श्रीकांत भारतीय

निगडीत 'लोकशाही रक्षकांचा' कृतज्ञता सोहळा

– आमदार श्रीकांत भारतीय यांनी दिला देशसेवेचा कानमंत्र!

पिंपरी-चिंचवड : २५ जून १९७५ रोजी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या आणीबाणीच्या काळ्या कालखंडाला ५१ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर, निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ सोहळ्यात आणीबाणीच्या काळातील संघर्षाचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला.

आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला. हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नसून नव्या पिढीसाठी संघर्षाचा दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय जनता पक्षाचा उदय हा आणीबाणीच्या काळात लोकांनी दिलेल्या असीम समर्पणातून झाला असून, ‘संघर्ष’ हा आमच्या पक्षाचा डीएनए (DNA) आहे, असे ते ठामपणे म्हणाले. इतिहास हा केवळ डोक्याने वाचायचा नसून तो हृदयाने समजून घ्यायचा असतो, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना लोकशाहीसाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव करून दिली आणि आपापसातील समन्वय वाढवण्याचे आवाहन केले.

शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आणीबाणीच्या काळातील भीषण आठवणींना उजाळा देत तत्कालीन काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता, ज्या दिवशी जनतेचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले गेले होते. मात्र, अनेक राष्ट्रभक्तांनी तुरुंगवास सोसला आणि अमानुष छळ सहन केला, परंतु हुकूमशाहीसमोर गुडघे टेकले नाहीत. त्यांच्या याच त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत, असे ते म्हणाले.

हेही वाचा –  हरमनप्रीत कौरच भारताची कर्णधार राहणार? T20 WC मधून बाहेर पडल्यानंतर प्रशिक्षक अमोल मुझुमदारांचं मोठं वक्तव्य

या सोहळ्यात आणीबाणीत सत्याग्रह करणाऱ्या आणि मिसा (MISA) कायद्यांतर्गत जेल भोगणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आमदार श्रीकांत भारतीय यांच्याहस्ते ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सभागृहात उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन भाजपा संघठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले.

या कार्यक्रमास आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, मा. आमदार अश्विनीताई जगताप, संयोजक संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, जेष्ठ नेते मधू जोशी, आणीबाणी सत्याग्रही संघटनेचे आबा खांबे, माजी अध्यक्ष डॉ.बाळकृष्ण नाईक, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी विरोधी पक्षनेत्या डॉ.गिताताई आफळे, मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये, संजय पटनी, संतोष तापकीर, कैलास सानप, अजय पाताडे, पोपट हजारे, राजू दुर्गे, देवदत्त लांडे, अजित कुलथे, नंदू भोगले, यांच्यासह सर्व मोर्चे, आघाडी व प्रकोष्ठ यांचे अध्यक्ष, सर्व मंडल अध्यक्ष अनेक पदाधिकारी, विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘भारत माता की जय’ आणि ‘लोकशाही अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे तर सूत्रसंचालन देवदत्त भिंगारकर यांनी केले आणि आभार कार्यक्रमाचे संयोजक मोरेश्वर शेडगे यांनी मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button