बिहार निवडणुकीवेळी राणाला फाशी होईल; संजय राऊत यांचा दावा

मुंबई : अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झालेल्या तहव्वूर राणाला तातडीने फाशी दिली जायला हवी. मात्र, चालू वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवेळी राणाला फाशी होईल, असा दावा ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला.
राणाच्या प्रत्यार्पणाचे श्रेय कुणी घेऊ नये. त्याला भारतात आणण्यासाठी १६ वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. त्या प्रयत्नांची सुरूवात केंद्रात कॉंग्रेसची सत्ता असताना झाली. कॉंग्रेसच्या सत्ताकाळातच बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेमला भारतात आणले गेले. राणाला अमेरिकेने देऊन टाकले. हिंमत असेल तर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमलाही आणले जावे, असे आव्हान राऊत यांनी मोदी सरकार आणि भाजपला दिले.
हेही वाचा – ‘खेलो इंडिया प्रकल्पात युवा खेळाडूंनी सहभागी व्हावे’; पद्मश्री मुरलीकांत पेटकर
हेरगिरीच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात अटक झाली. ते अजूनही तेथील तुरूंगातच आहेत. त्यांना भारतात परत आणले गेल्यास आम्ही स्वागतच करू. नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांसारखे आर्थिक गुन्हेगार भारतातून पसार झाले. त्यांच्या प्रत्यार्पणाचीही निश्चिती केली जावी, अशी मागणी करत राऊत यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांना घेरले.