‘इलेक्ट्रिक सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप’मध्ये पीसीसीओई अव्वल
शिक्षण विश्व: राष्ट्रीय पातळीवर पटकावला पहिला क्रमांक

पिंपरी : इलेक्ट्रिक सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप (इएसव्हीसी) ३००० या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) टीम सोलरियमने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा मार्च ते एप्रिल २०२५ दरम्यान ग्रेटर नोएडा येथे पार पडली.
२०१६ मध्ये स्थापन झालेली टीम सोलरियम ही पीसीसीओईची अधिकृत सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक वाहनांची टीम आहे. शाश्वत वाहतूक तंत्रज्ञानात नाविन्य आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही टीम आज राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. सातत्यपूर्ण मेहनत, तांत्रिक कौशल्य आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यांच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत टीम सोलरियमने देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांशी स्पर्धा पीपल्स चॉईस पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नाविन्य पुरस्कार, सर्वात हलकं वाहन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहनशक्ती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिकल सिस्टीम पुरस्कार या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.
हेही वाचा – पिंपळे गुरव परिसरातून २५ मोटार पंप जप्त; नळ कनेक्शनला पंप जोडणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू
या विजयामुळे पीसीसीओईने केवळ राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली नाही, तर शाश्वत वाहतूक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरीत आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले, अशी भावना पीसीईटी विश्वस्त मंडळाने व्यक्त केली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
या संघाला पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निलकंठ चोपडे, अधिष्ठाता डॉ. पद्माकर देशमुख, मार्गदर्शक प्रा. डॉ. जया गोयल तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग आणि कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले.