‘भारत सध्या विश्वगुरू नाही’; भाजप नेते मुरली मनोहर जोशींचे विधान

नवी दिल्ली | माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी ‘भारत विश्वगुरू आहे’ या संकल्पनेवर स्पष्ट मत व्यक्त करत सध्या भारताला ‘विश्वगुरू’ म्हणणे योग्य नसल्याचे सांगितले. ‘संस्कृत भारती’च्या मुख्यालयाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा शब्दप्रयोग वापरणे टाळावे, असा सल्लाही दिला.
मुरली मनोहर जोशी म्हणाले की, आपण ‘विश्वगुरू’ आहोत, ही धारणा आजच्या काळात वापरणे टाळले पाहिजे. आपण सध्या ‘विश्वगुरू’ नाही. मात्र, ‘विश्वगुरू’ होण्याची आकांक्षा ठेवली पाहिजे, असे जोशी म्हणाले. आपण एकेकाळी ‘विश्वगुरू’ होतो. तथापि, आजचे वास्तव असे आहे की आपण विश्वगुरु नाही, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : राज्यात वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
संस्कृत भाषेला भारताची अधिकृत भाषा झाली पाहिजे. संविधाननिर्मितीच्या काळात डॉ. आंबेडकर यांच्यासह अनेक विद्वानांनी संस्कृतला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केला होता, मात्र ते प्रस्ताव मंजूर झाले नाहीत, असेही जोशी म्हणाले.
संस्कृत वैचारिक परंपरेचा आधार : मोहन भागवत
संस्कृत ही केवळ भाषा नसून भारताच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेचा मूळ आधार आहे. संस्कृतचा प्रसार वाढल्यास इतर सर्व भारतीय भाषा समृद्ध होतील, त्यांच्यात परस्पर नाते निर्माण होईल आणि समाज भारताच्या प्राचीन विचारसरणीशी तसेच संस्कृतीशी अधिक घट्ट जोडला जाईल, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी व्यक्त केले.





