‘तुमचा स्तर कोणता सांगा?’; सुषमा अंधारेंचे मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई | महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलेल्या ‘ओपन डिबेट’च्या आव्हानानंतर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “महिला खासदारांनी आव्हान स्वीकारल्यावर तुम्ही पवारांचे नाव घेता, याचा अर्थ तुम्ही महिलांना तुच्छ लेखताय का?” असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, तुमचा स्तर कोणता सांगा? नामदेव ढसाळांची फार सुंदर कविता आहे. ‘तुही यत्ता कंची?’ फडणवीस तुमचा स्तर सांगा कोणता? वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्ही ज्येष्ठ आणि मी कनिष्ठ आहे असं म्हणायचं आहे का? तुम्ही प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे यांचा अवमान करताय. हे विधेयक संसदेतील विधेयक, हे विधेयक महिला आरक्षणाचं बिल, हे बिल महिलांच्या प्रतिनिधित्वाचं बिल, दोघीही संसदेत आहेत. दोघींनीही तुम्हाला उत्तरं दिलं. दोघींच्या उत्तरांना तुम्ही नाकारता. याचा अर्थ तुम्ही महिलांना कमी लेखता. दोघीही बोलल्यावर तुम्ही म्हणालात की पवार साहेब बोलले पाहिजेत. महिलांनी उत्तर दिल्यावर तुम्ही त्यांना तुच्छ समजताय. तुम्ही तुमचा स्तर उच्च दाखवताय. मग तुमचा स्तर कसा ठरतो?
हेही वाचा : ‘भारत सध्या विश्वगुरू नाही’; भाजप नेते मुरली मनोहर जोशींचे विधान
मुख्यमंत्री जर तुम्ही स्तराची भाषा करत असाल तर तुमच्या चांगदेवाचा अहंकार भरलाय का पाहा, असंही त्या म्हणाल्या. तुम्हाला खरंच महिलांची चाड आहे? एकदा पंकजा मुंडेंनी म्हटलं की मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे. १२ वर्षे त्या माऊलीला वनवासात जावं लागलं. तुम्ही प्रोगेसिव्ह मानसिकतेचे व्हा आणि एखादीला मुख्यमंत्री बनवून दाखवा. १ कोटी सह्यांसाठी आम्हीही दाखल होतो, असंही प्रतिआव्हान त्यांनी दिलं.
काल तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली, त्यात एक खासदार, एक मंत्री, एक उपसभाती होत्या. पण तरीही एकीच्याही हातात माईक दिला नाहीत. त्या कळसुत्री बाहुल्यांसारख्या बसल्या होत्या. मला काहीच बोलायचं नाही, मला एवढंच सांगायचं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाईक असाल तर तीन गोष्टी करा. एक, स्त्रियांच्या हक्कांची पहिली भ्रूणहत्या हत्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदनमोहन मालविय यांनी का केली होती, याचं उत्तर द्या; २, ज्योतिबा फुले यांचा नामोल्लेख केला, तर त्यांचं गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड हीपुस्तके जाहीरपणे आरएसएसच्या व्यासपीठावर वाचायची तयारी आहे का? तिसरं, फडणवीस पळ काढायचा नाही, असंही त्या म्हणाल्या.





