राज्यात वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मुंबई | राज्यात सध्या अस्थिर हवामानाची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यावर वादळाचा प्रभाव कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मेघगर्जनेसह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागांत गारपीट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या राज्यावर पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारपासून पावसाचा प्रभाव वाढल्याने बहुतांश भागांत पावसाची नोंद होत आहे.
अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.
हेही वाचा : मुंबईच्या दमदार विजयाने गुणतालिकेत उलथापालथ; तीन संघांना मोठा धक्का
काही भागात उष्णतेची लाट कायम
राज्यात एकीकडे पावसाळी वातावरण असताना विदर्भातील अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत उष्णतेची लाटसदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील दोन दिवसांत काही भागांत तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने घटण्याची शक्यता असून नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळू शकतो.
‘एल निनो’चा प्रभाव; पावसाबाबत चिंता
यंदा प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे देशासह राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामानातील या अस्थिरतेचा परिणाम नागरिकांसह विशेषतः शेतकऱ्यांवर होत असून आगामी मे महिन्यातील हवामानाबाबत चिंता वाढत असल्याचे चित्र आहे.





