भारताने पाकिस्तानला खडसावले, “परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्या…”

India Vs Pakistan : भारत-पाकिस्तानमध्ये शनिवार 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू झाली होती. मात्र शस्त्रसंधी झाल्याचा काही तासांतच पाकिस्तानकडून त्याचे उल्लंघन करण्यात आले. जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर राजौरी, उधमपूर, या भागात गोळीबार सुरु केला. यामुळे श्रीनगरमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज येत होते. दरम्यान पंजाबच्या पठाणकोटमध्ये गोळीबार सुरु केला होता, जैसलमैर आणि बारमेडमध्येही ड्रोन दिसत होते. शस्त्रविरामानंतर पाकड्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच असल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानच्या कुरापती थांबत नसल्याने भारताने पाकिस्तानला सूचक इशारा दिला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानच्या कुरापतीबाबत काल रात्री ११ वाजता पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे. पाकिस्तानने परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या, असं म्हणत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे. पाकिस्तानने आज झालेल्या शस्त्रविरामाच्या कराराचं उल्लंघन केले असून भारतीय सशस्त्र दल योग्य प्रत्युत्तर देत असल्याचं विक्रम मिस्री यांनी सांगितलं.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये एक समझोता झाला. पण गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून या सामंजस्याचे उल्लंघन केले जात आहे. भारतीय सैन्य या सीमेवरील घुसखोरीला प्रत्युत्तर देत असून, पाकिस्तानने या घटनेकडे गांभीर्याने पाहावे.”
“ही घुसखोरी अत्यंत निंदनीय आहे आणि त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. आम्हाला वाटते की पाकिस्तानने ही परिस्थिती योग्यरित्या समजून घ्यावी आणि ही घुसखोरी थांबवण्यासाठी त्वरित योग्य कारवाई करावी. पाकिस्तनाच्या प्रत्येक हालचालीवर भारताची करडी नजर आहे, पाकिस्तानने कुरापती थांबवल्या नाही तर, आम्ही आमच्या तिन्ही सैन्यदलांना प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे,” असं सुनावलं आहे.
याशिवाय भारतीय सशस्त्र दल परिस्थितीवर नजर ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच नियंत्रण रेषेवर सीमा उल्लंघनाच्या पुनरावृत्तीच्या कोणत्याही घटनांना कठोरपणे सामोरे जाण्याच्या सूचना भारतीय सशस्त्र दलांना देण्यात आल्या असल्याची माहिती देखील मिस्री यांनी दिली आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या डीजीएमआय यांच्याशी 10 मे रोजी दुपारी 3.35 वाजता फोनवरून चर्चा केली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडील गोळीबार, जमिनी लष्करी कारवाई तसेच हवाई आणि समुद्री कारवाई भारतीय वेळेनुसार काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून थांबवण्याबाबत एकमत झालं आणि त्यानंतर शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली.
मात्र अवघ्या तीन तासांतच सीमेवरील जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमधील काही भागात पाकिस्तानी सैन्यानं ड्रोन हल्ले केले. यावेळी काही काळासाठी या भागांमध्ये ब्लॅक आऊटही करण्यात आला होता.