राज्यभरात तिरंगा रॅली ! ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ पायी यात्रेचे आयोजन

Operation Sindoor : राज्यातील महायुती सरकारकडून विविध जिल्ह्यात ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ रविवार दि. ११ मे रोजी पायी यात्रेचे आणि तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर, भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ अनेक जिल्ह्यात ही रॅली निघणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही या रॅलीत सहभाग असणार आहे. यासह महायुतीमधील अनेक मंत्री आपआपल्या जिल्ह्यातून या रॅलीत सहभाग घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात तिरंगा रॅली निघणार असून ऑपरेशन शिंदूर’च्या समर्थनार्थ ही तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत.
हेही वाचा – भारताने पाकिस्तानला खडसावले, “परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्या…”
या तिरंगा रॅलीत मोठ्या प्रमाणात नागपूरकर सहभागी होणार आहेत. शहरातील लॉ कॉलेज चौक ते शंकर नगर चौक दरम्यान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: तिरंगा रॅलीत पायी सहभागी होणार आहेत.
राज्यभरात ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतही उद्या तिरंगा रॅली निघणार असून ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहनही शिंदेसेनेकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरित मंत्री उदय सामंत यांच्याकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून उद्या शिंदेसेनेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही तिरंगा रॅली काढली जाईल.