ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

उच्चशिक्षित घरभेदी गद्दारांची फौज, पाकड्यांचे गुप्तहेर, करतात मौज !

भारतात राहून, पाकड्यांची चाकरी करत भारताची गुपिते त्यांना देण्याच्या बदल्यात करोडो रुपये कमावणाऱ्या देशद्रोही गद्दारांची फौजच्या फौज कार्यरत असल्याचे पाहून मन अक्षरशः विषण्ण होते.

प्रतिष्ठित नागरिक म्हणून वावरतात..

दररोज सापडत असलेले हे महाभाग अत्यंत उच्चशिक्षित आहेत, समाजामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून वावरत आहेत आणि पाकिस्तानने फेकलेल्या काही पैशाच्या तुकड्याच्या बदलात देशद्रोहीपणा, घरभेदीपणा आणि गद्दारी करताना त्यांना किंचितही लाज वाटत नाही, ही गोष्ट खऱ्या अर्थाने चिंताजनकच म्हणावी लागेल.

निमित्त ‘यु ट्युब’र ज्योती मल्होत्राचे..

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे, त्यामुळे हा प्रश्न अचानक पडला आहे. शास्त्रज्ज्ञ प्रदीप कुरुलकर, पंकज शर्मा, अच्युतानंद मिश्रा, ध्रुव सक्सेना, माधुरी गुप्ता आणि आता ज्योती मल्होत्रा..देशद्रोही गद्दारांची ही काळीकुट्ट यादी यादी संपता संपेना !

लाज कशी वाटत नाही..

इतर देशद्रोह्यांप्रमाणेच ज्योती मल्होत्रादेखील आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानला गेली आहे. पाकिस्तान गुप्तहेर संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत किंवा त्यांच्या पैशाच्या जोरावर तिने अनेक देशांमध्ये भटकंती केली असल्याचे उघड झाले आहे, हे खरे आमचे दुर्दैव!

पाकड्यांसाठी हेरगिरीचा थेट आरोप !

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली हिसारमधील न्यू अग्रसेन कॉलनीतील रहिवासी असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही ३३ वर्षाची असून एका सामान्य घरातील मुलगी आहे. पण, विलासी जीवन जगण्याच्या सवयीने तिला देशविरोधी कारवाया करण्याची इच्छा झाली. ज्योतीला पैसे कमवण्याची इतकी तीव्र इच्छा होती. तिने नोकरी सुरू केली होती. पण, त्या तुटपुंज्या पगारावर तिचे समाधान होत नव्हते. या ठिकाणाहून तिचा सुरू झालेला प्रवास हा थेट पाकिस्तानची हेरगिरी करण्यापर्यंत पोहोचला.

‘सोशल मीडिया’ ची ताकद..

पैसे पुरत नाहीत हे लक्षात आल्यानंतर तिने सोशल मीडियावर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. त्यावेळी तिला ‘सोशल मीडिया’ ची ताकद लक्षात आली, आणि खऱ्या अर्थाने ती परिपक्व झाली. ज्योतीने यूट्यूब व्हीडिओ आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगमधून पैसे कमवायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. पैशांची चटक लागल्यावर मोठ्या गाड्यांमध्ये प्रवास करण्याची, प्रतिष्ठित नागरिक, उद्योगपती, व्यापारी अशा लोकांसोबत वेळ घालवण्याची, खाण्याची आणि पिण्याची आणि बँक खात्यात मोठी रक्कम दिसावी, यासाठी तिने कोणत्याही थराला जाण्याची हिंमत झाली.

लाखो फॉलोअर्स हेच भांडवल..

ज्योतीचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाच्या चॅनलवर काही लाख फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर १.३१ लाख फॉलोअर्स आहेत.ज्योती भारत आणि परदेशातील तिच्या प्रवासाशी संबंधित विशिष्ट ठिकाणांबद्दलच्या आठवणी आणि माहिती शेअर करते. ज्योतीचे असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यात तिने पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवली आहे.

ज्योतीच्या मागे ससेमिरा..

हिसार पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा जणांना अटक केली. यामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​आणि तिच्या पाच मैत्रिणींचा समावेश आहे. ज्योतीला हिसारमधील न्यू अग्रसेन एक्सटेंशन येथून अटक करण्यात आली. ज्योतीने २२ ऑक्टोबर २०१८ रोजी तिचा पासपोर्ट बनवला. त्यानंतरही तिने काम सुरू ठेवले. युट्युब चॅनेलनंतर तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंग सुरू केले. या दरम्यान ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशच्या संपर्कात आली आणि अलगद हेरगिरीच्या जाळ्यात अडकली.

पाकिस्तानची भेट महत्त्वाची..

तिने दानिशचा मोबाईल नंबर घेतला. दोघेही एकमेकांशी बोलू लागले. त्यानंतर तिने दोनदा पाकिस्तानला भेट दिली. ‘आयबी’ कडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती दिल्लीहून एका शीख गटासह दोनदा पाकिस्तानला गेली आहे आणि एकदा एकटीच कर्तारपूरसाहिब गुरुद्वाराला भेट देण्यासाठी गेली होती. तिने दुबई, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशचाही प्रवास केला असल्याचे उघडकीस आले आहे.

हेरगिरीचे बिंग फुटले..

दानिशच्या माध्यमातून ज्योतीने पाकिस्तानच्या हेरगिरी करणाऱ्या संस्थेची संधान बांधले. त्यांच्याशी अनेक वेळा गाठीभेटी घेऊन भारताची गुपिते त्यांच्यापर्यंत पोहोचवली. नंतर तिने भारतात राहूनच मोबाईलद्वारे तसेच सोशल मीडियाच्या अन्य प्लॅटफॉर्म द्वारे त्यांच्याशी संपर्क कायम ठेवला. ज्योतीचे बिंग फुटले आहे, त्यातून आता बरीच लफडी बाहेर पडतील.

हेही वाचा –  पुण्यात फर्ग्युसन रस्त्यासह अनेक ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई करून पदपथ मोकळे

बापरे, केवढी ही देशद्रोह्यांची फौज!

ज्योती मल्होत्राच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षातील देशद्रोह्यांच्या यादीवर सहज नजर टाकली, तर प्रदीप कुरुलकर, पंकज शर्मा, अच्युतानंद मिश्रा, ध्रुव सक्सेना, माधुरी गुप्ता या उच्चशिक्षित घरभेदी गद्दारांची यादीच समोर येते. उच्चशिक्षित गद्दारांनी देशांशी केलेली गद्दारी चिंतेचा विषय त्यामुळेच वाटत आहे.

लिंगपिसाट कुठले, ‘हनी ट्रॅप’ भोवले..

हेरगिरीच्या आरोपात सर्वात संवेदनशील अटक ‘डीआरडीओ’ चा वैज्ञानिक प्रदीप कुरुलकरची ठरली होती. मुलीच्या वयाच्या तरुणीशी चाळे करण्याच्या नादात प्रदीप कुरुलकरने थेट मिसाईल, ड्रोन आणि रोबोटिक्स प्रणालीची अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली होती. २०२० पासून ते आतापर्यंत अकरा नौसैनिकांसह १८ जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील बहुतांश महिला एजंटच्या ‘हनी ट्रॅप’ मधून पाकिस्तानच्या गळाला लागले आहेत.

यंदा आतापर्यंत पाच जणांना अटक

या वर्षात पाकिस्तानी हनी ट्रॅप आणि आयएसआयच्या जाळ्यात अडकून संवेदनशील माहिती देत गद्दारी करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. देशातील तपास यंत्रणांकडून भटिंडा पंजाबमधून रकीब खानला अटक करण्यात आली. तत्पूर्वी, मार्च महिन्यात सुनील कुमार रामला सुद्धा तेथून अटक करण्यात आली. त्याच्यावर युनिटची लोकेशन डिटेल्स पाठवल्याचा आरोप होता. मार्चमध्ये रविंद्र कुमार आणि शाहबाज खानला कानपूर पोलिसांनी अटक केली. या दोघांना नेहा शर्माच्या नावाने हनी ट्रॅप झाला होता.

अकरा नौदल कर्मचारीही अटकेत..

डिसेंबर २०२० मध्ये आंध्र प्रदेश पोलिसांनी नौदलाच्या गुप्तचर विभागाशी संयुक्तपणे सहकार्य करत एका कथित हेरगिरी प्रकरणात अकरा नौदल कर्मचारी आणि दोन नागरिकांसह तेरा जणांना अटक केली होती. पाकिस्तानी आयएसआयच्या एजंटांनी सोशल मीडियावर त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. २००७ मध्ये ‘आयएफएस’ अधिकारी माधुरी गुप्ताला अटक करण्यात आली होती. माधुरी इस्लामाबाद उच्चायुक्तालयात सेकंड सेक्रेटरी अधिकारी होती. ऑक्टोबर २००९-१० या कालावधीत ‘आयएसआय’ हँडलर सोहैल याला तिने २३ प्रकारची गोपनीय माहिती पाठवली होती. २०१८ मध्ये तीन वर्षाची शिक्षा पूर्ण झाली आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे माधुरीचा मृत्यू झाला. ऑगस्ट २०१९ मध्ये ‘बीएसएफ’ हेड कॉन्स्टेबल पंकज शर्माला अटक करण्यात आली. व्हॉट्सॲपने रोस्टर फोटो लीक केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

शेकडो बनावट सिमकार्ड..

त्यानंतर आयटी व्यावसायिक ध्रुव सक्सेनाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे शेकडो बनावट सीम कार्ड सापडली होती. जुलै २०२० मध्ये सज्जन तिवारी या बीएसएफ कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. तो हनी ट्रॅपमध्ये सापडला होता. आर्मी लान्स नाईक निर्मल रायला ऑगस्ट २०२० मध्ये अटक केली होती. इजिप्शियन महिला हनी ट्रॅपमध्ये अडकलेला बीएसएफ जवान अच्युतानंद मिश्राला अटक झाली होती. जम्मू – काश्मीर पोलिसांनी लष्कराचा दहशतवादी आदिल ऊर्फ ​​संदीप शर्माला अटक केली होती. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात संदीप कुमारचाही सहभाग होता ज्यामध्ये सहा पोलिस ठार झाले होते.

देशद्रोह्यांची यादी वाढतच राहणार..

देशद्रोही गद्दारांची ही फौज संपणारी नाही. बहुतेकांना अगदी एक लाखांपेक्षा कमी किंवा काहींना केवळ भावनिक करून माहिती चोरण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून रोमान्स आणि लैंगिक गप्पांचा फॉर्म्युला वापरून कमी खर्चात हेरगिरी करून घेतली जाते आणि आपले नतद्रष्ट, देशद्रोही गद्दार ती माहिती अत्यंत शिताफीने पुरवतात..काहींना मोठ्या रकमेचा लाभ होतो तर काही लिंगपिसाट महिलांच्या हनी ट्रॅप मध्ये अडकतात..आयुष्यातून उठतात हे मात्र खरे !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button