जिल्हा परिषद निवडणूक निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; अजित पवारांची आठवण काढत म्हणाले…

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज (९ फेब्रुवारी) या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जात आहे. या निकालांमध्ये महायुतीमधील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी घवघवीत यश मिळाले आहे. या विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे निकाल हाती येत आहेत. आता मोजणीचा शेवटचा टप्पा चालू आहे. आत्तापर्यंत हाती आलेले निकाल आणि अंतिम टप्प्यातील कल लक्षात घेता, महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवला आहे. १२ जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थापित झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि १२ ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता स्पष्ट झाले आहे.
जवळपास ६० ठिकाणी भाजपा एक नंबरवर आहे. छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा. शिवसेना दोन ठिकाणी नंबर एकवर आहे, रत्नागिरी आणि रायगड. राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर एकवर आहे. आणि जेथे तीनही पक्ष एकत्र लढलो अशा कोल्हापूर आणि लातूर येथे महायुतीत नंबर एकवर आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पक्षानेदेखील आपला २०१७ चा रेकॉर्ड देखील भाजपाने मोडला आहे, २०१७ साली या जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला १४१ जागा होत्या, पण आत्तपर्यंत घोषित झालेल्या निकालांमध्येच २३६ जागा भाजपाला मिळाल्या आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडचा पै. श्लोक ताम्हाणे यांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कमावले कांस्यपदक
पंचायत समिती निवडणूक निकालाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, २०१७ साली भाजपावा एकूण २८४ जागा होत्या पण आत्तापर्यंतच्या जाहीर झालेल्या कलांमध्ये ४१० जागा भाजपाला मिळालेल्या आहेत. साधारणपणे १२५ पंचायत समितींचा कल बघितला तर यापैकी ५० पंचायत समिती या भाजपाकडे, २६ शिवसेनेकडे असतील, २३ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील, बाकी ७-८ काँग्रेसकडे, ७ ते ८ शरद पवारांच्या पक्षाकडे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे ५ जागा असतील. त्यामुळे इथे देखील महायुतीला १२५ पैकी १०० च्या वर पंचायत समिती जिंकता आल्या आहेत.
निवडणुक निकालांवर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अकाली निधन झालेले राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण देखील काढली. दुर्दैवाने या निवडणुकीदरम्यान आमचे महायुतीमधील एक वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याचेही एकप्रकारे दु:ख आम्हा सर्वांना आहे. त्यामुळे मी स्वत: निर्णय केला होता की मी प्रचार करणार नाही. त्यामुळे एका आवाहनाचा व्हिडीओ सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये प्रसारित केला होता. पण एकूणच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता यामधून समोर आली आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.




