पिंपरी-चिंचवडमधील नारीशक्तीचा मुंबईत ‘आक्रोश’
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांचा आंदोलनात सहभाग

सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची उपस्थिती
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
नारीशक्तीचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील महिलांनी मुंबईत ‘आक्रोश आंदोलन’ छेडले आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या आज सकाळी मुंबईकडे रवाना झाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या महिला आरक्षणाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या पक्षांविरोधात महिलांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ‘नारी-शक्ती वंदन अधिनियम’ या महिला आरक्षणाच्या ऐतिहासिक विधेयकाला विरोध करून विरोधकांनी महिलांविरोधी मानसिकता दाखविल्याचा आरोप करण्यात आला.
महिलांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने मुंबईतील वरळी येथील जांबोरी मैदानावर या ‘आक्रोश आंदोलनाचे’ आयोजन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरातून मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी झाल्या असून, सकाळपासूनच त्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आणि आंदोलनात सहभागी झाल्या.

हेही वाचा : एमआयडीसीतील पाणी, स्वच्छता व रस्ते प्रश्न तातडीने सोडवणार; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
या आंदोलनास राज्याचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख आयोजकांनी केला आहे. केंद्र सरकारने महिलांना आरक्षण देऊन सन्मानित केले असताना, केवळ राजकीय स्वार्थापोटी काही पक्ष त्याला विरोध करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
“देशातील नारीशक्तीचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र, काही पक्ष महिला आरक्षणाला अडथळा निर्माण करत आहेत. हा केवळ विधेयकाचा विरोध नसून संपूर्ण स्त्रीशक्तीचा अपमान आहे. हा अपमान भाजप सहन करणार नाही,” असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, मुंबईतील जी. एम. भोसले मार्ग परिसरात महिलांची मोठी गर्दी उसळली असून, आंदोलनादरम्यान विरोधकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
या प्रसंगी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, या आंदोलनामुळे राज्यभरात या विषयावर चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“नारीशक्तीचा अपमान करणाऱ्यांना आता शब्दांनी नाही, तर रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं—ही लढाई केवळ अधिकारांची नाही, तर स्वाभिमानाची आहे. पिंपरी-चिंचवडची नारीशक्ती गप्प बसणार नाही; अन्याय करणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय थांबणार नाही!”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा, पिंपरी-चिंचवड.





