अध्यात्म । भविष्यवाणीराजकारण

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी.

माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही. तो मदत करतो किंवा आड येतो, या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठे गुंतते हे पहावे. भगवद्भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले, पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची. तेव्हा, त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळू लागला, भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला, तर कसे होणार ? आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचे मोठे केले, तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैऱ्यासारखी वाटू लागली ! वास्तविक, दोघांच्याही देहांत फरक होण्यासारखे असे काहीच झाले नाही; पण वृत्तीत बदल झाला. विषयातच मी गुंतून राहू लागलो, याला काय करावे ?

हेही वाचा –  पुण्यात फर्ग्युसन रस्त्यासह अनेक ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई करून पदपथ मोकळे

‘ मी सुखी कशाने होईन ’ हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले; पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दु:ख असे काही आहे का ? जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही, त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो. दुसरा मनुष्य ज्या वेळी आपल्याला त्रास देतो, त्या वेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते. बाकी उरले पन्नास टक्के; त्याबद्दल ‘ त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ’ ही वृत्ती असावी, म्हणजे संपले ! आपली वृत्ती सारखी बदलते आहे, आणि जगही सारखे बदलते आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दु:ख होते हे वाटणे खरे नव्हे, कारण सुखदु:ख अस्थिर असते. शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. भजन, पोथीवाचन, मंदिर बांधणे, वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशीयात्रा घडत नाही, यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना. गंगास्नान, विश्वेश्वराचे दर्शन, वगैरे आतल्या लोकांना घडते. त्याचप्रमाणे, देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. भगवंताचे रूप सारखे समोर ठेवता येणार नाही, पण त्याचे रूप लक्षात आले नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारेल. आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो. त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते. ती भगवंतालाच कळते, म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही, त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली हे समजावे. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यांत खरे समाधान, शांती आणि सुख आहे.

बोधवचन:- वृत्ती स्थिर होणे, शांत होणे, याचे नाव समाधान, आणि भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणे याचे नाव समाधि होय.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button