तापमानात घट; दोन दिवस पावसाची शक्यता! रात्री तुरळक पाऊस; दिवसा ऊन-सावल्यांचा खेळ

जळगाव : राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात देखील पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला असून, रविवारी रात्रीच्या सुमारास काही भागात तुरळक पाऊस झाला. परिणामी, आजचे कमाल तापमान देखील खाली आले. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे.
मागील आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर गेल्याने उन्हाच्या प्रचंड तीव्र झळा जाणवू लागल्या होत्या. यासोबतच उकाडा देखील वाढला होता. यामुळे जळगावकरांना वैशाख महिन्यात जाणविणार्या उन्हाची तीव्रता याच महिन्यात जाणवू लागली होती. दरम्यान. हवामान विभागाकडून २० ते २४ एप्रील दरम्यान राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. यात जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश असून, जिल्ह्यात देखील पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा – “अजित पवारांच्या अपघाताचं सत्य शोधल्याशिवाय शांत बसणार नाही”, बारामतीच्या सांगता सभेत फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. उन्हाची तीव्रता जाणवत नसली तरी उष्णता मात्र कायम होती. परंतु, रविवारी (ता.१९) मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली होती. तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. तर सकाळी देखील ढगाळ वातावरण असल्याने आजच्या कमाल तापमानात घट होऊन ४१ इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तसेच उन्हाच्या झळा देखील काहीशा कमी झाल्या आहेत.
गेल्या आठवड्यात तापमान ४२ अंशावर गेले असताना उष्णता अधिक जाणवत होती. आता मात्र दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण झाले असून, काही भागात पाऊस देखील झाला आहे. या बदललेल्या वातावरणात उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी उकाड्यात मात्र प्रचंड वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील काही भागात रविवारी रात्री तुरळक पाऊस झाला असून, दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार २१ व २२ एप्रिलला काही भागात विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.





