“अजित पवारांच्या अपघाताचं सत्य शोधल्याशिवाय शांत बसणार नाही”, बारामतीच्या सांगता सभेत फडणवीस काय म्हणाले?

Baramati Bypoll: “सुनेत्रा पवार यांचा विजय संपर्ण भारतात गाजला पाहिजे”, असे म्हणत बारामतीकरांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोटनिवडणुकीसाठीच्या सांगता सभेला फडणवीस यांनी हजेरी लावत दादांच्या आठवणींना उजाळा दिला. “आमच्यासाठी ही निवडणूक नव्हे तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ सुरु आहे. सभेसाठी माझ्यासह कोणीही आले नसते तरी सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी निवडून आल्या असत्या”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधी पक्षांचे आभार मानले. शरद पवार यांनी फोन करुन सुनेत्रा पवार यांना समर्थन असल्याचे सांगत त्यांचेही आभार मानले. “एखाद्या नेत्याच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध करण्याची संस्कृती महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी नमूद केले. आमच्यासाठी ही निवडणूक नव्हे तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ सुरु आहे. सभेसाठी माझ्यासह कोणीही आले नसते तरी सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी निवडून आल्या असत्या. दादांच्या पश्चात वहिनींसाठी बारामतीकरांना रेकॉर्ड करुन दाखवायचा आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – सुनेत्रा पवारांना मतदान करा; शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन
दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झाले आहे, असे सांगताना दादांच्यानंतर दु:ख बाजूला सारून त्यांनी जबाबदारी स्वीकारली, असे फडणवीस म्हणाले. दादांच्या पश्चात वहिनींनी राज्य आणि पक्षाची धुरा स्वीकारली. अनेकांनी त्यांच्या राजकीय अनुभवावर प्रश्न उपस्थित केला, पण वहिनींनी दादांच्या बरोबरीने अगदी जवळून राजकारण पाहिले आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात काम केले आहे. वहिनींमध्ये दादांची सर्व स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘पुढचे १० -१५ वर्षे दादा, शिंदे आणि मी इथं काम करु’, असे आश्वासनही फडणवीसांनी बारामतीकरांना दिले. “बारामतीत रेकॉर्डब्रेक मतदान झालं पाहिजे. समोरील उमेदवारांवर टीका करणार नाही, प्रसिद्धीपोटी असे अनेकजण असे प्रकार करत असतात”, अशी टीकाही त्यांनी केली. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबतही त्यांनी यावेळी आश्वत केले. “अपघाताचं सत्य बाहेर आलं पाहिजे अशी अनेकांची इच्छा आहे, सभागृहातही मी सांगितलं आहे. सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाच्या शेवटी नमूद केले.





