जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत”
प्लास्टिकमुक्त ग्रामसंस्था व स्वच्छतेसाठी विशेष स्वच्छता मोहीम

नागपूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत” या संकल्पनेनुसार २२ मे ते ५ जून या कालावधीत विशेष प्लास्टिकविरोधी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सर्व ग्रामपंचायतींत मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत प्लास्टिक संकलन, श्रमदानातून स्वच्छता, एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी, कचऱ्याचे वर्गीकरण, पाणवठ्यांची स्वच्छता यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. “टाकाऊपासून टिकाऊ” या संकल्पनेतून प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
हेही वाचा – वेळेच्या आठ दिवस आधीच मोसमी पाऊस दाखल; गेल्या १६ वर्षांत भारतात सर्वात लवकर आगमन
२८ मे रोजी “मासिक पाळी व्यवस्थापन दिन” साजरा करण्यात येणार असून किशोरवयीन मुली व महिलांना स्वच्छतेचे महत्त्व आणि सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराविषयी मार्गदर्शन केले जाईल. यामध्ये आरोग्य विभाग, महिला बचत गट, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आशा वर्कर्स यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
गावपातळीवर उपलब्ध स्वच्छता सुविधांचा प्रभावी वापर, घनकचरा व्यवस्थापन, आणि भविष्यातील विकास आराखड्यांतील सुधारणा या मोहिमेमुळे शक्य होणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षण आणि सामाजिक जागृतीस चालना मिळून प्लास्टिकमुक्त, स्वच्छ आणि टिकाऊ ग्रामसंस्था घडविण्याचा मार्ग सुकर होणार आहे.