दोन्हीही युद्धांमध्ये विजय महत्त्वाचा .. रणभूमीवर आणि ‘माहिती युद्धा’तही !

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेऊन भारतीय जवानांनी अचूक कामगिरी केली. प्रत्यक्ष युद्धभूमीवरील युद्धात भारताने पाकड्यांना घरात घुसून मारले, हे पाक आणि त्यांची मित्रराष्ट्रेही मान्य करतात. पण हल्ली दुसरी लढाई देखील लढावी लागते, ती म्हणजे जगापुढे माहिती आणि पुरावे मांडण्याची..थोडक्यात मीडियाची ! आणि त्यातही भारताने पाकड्यांना चारी मुंड्या चीत केले आहे, हे आता वेगळे सांगायला नको !
अड्डे उद्ध्वस्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट !
पाकड्यांच्या आशीर्वादाने चाललेले आणि त्यांच्या लष्कराने आश्रय दिलेले दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करून भारताचे मुख्य उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यानंतर पाकिस्तानची मस्ती सुरूच होती आणि त्यांच्या हवाईतळांवर आणि लष्करी व्यवस्थापनांवर करण्यात आलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले हे त्यांच्या मस्तीच्या प्रयत्नांना दिलेले प्रत्युत्तर होते. त्यात पाकिस्तानची अपरिमित हानी झाली, हे सर्वांनी मान्य केले ! एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की कारवाईच्या त्या चार दिवसांचा पाकिस्तानला आलेला खर्च भारताच्या तुलनेत जवळजवळ सोळा पट आहे. त्यांचे किती नुकसान झाले त्याचा विचार केलेला बरा !
भारताचे यश न बघवणारी राष्ट्रे..
भारताला मिळालेले हे एकतर्फी यश अनेक राष्ट्रांना सहन झाले नाही. पाक, त्यांचे मित्र आणि त्यांना कायम खतपाणी घालणारी पाश्चिमात्य माध्यमे मात्र भारताचे हे यश सतत झाकोळून टाकायचा प्रयत्न करत राहिली. हे सर्वजण एकत्र येऊन एकसंधपणे आणि नियोजित पद्धतीने भारताच्या विरोधात माहिती युद्ध राबवत होते आणि पडद्यामागे दुसरे युद्ध लढत होते.
सरतेशेवटी भारतच वरचढ..पण,
या कारवाईमध्ये प्रत्यक्षात भारत वरचढ ठरला असला तरी त्याच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांनी, विश्लेषणांनी आणि रिपोर्टनी पाकच्या फाटक्या झोळीत न मिळालेल्या विजयाचे श्रेय टाकले. परिणामी, प्रत्यक्ष अवकाशात विजय मिळवूनही भारताला आर्थिक, जागतिक नुकसान सहन करायला लागू शकते. त्यामुळे, यापुढे संघर्ष करण्याची वेळ आली, तर लष्करी यशा बरोबर माहिती युद्धातही तितक्याच सामर्थ्याने उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष रणभूमीवरील संघर्षाइतकीच जागतिक जनमताची लढाईही निर्णायक ठरते, हे एव्हाना भारतीय सत्ताधाऱ्यांनाही समजून चुकले असणार !
हेही वाचा – वेळेच्या आठ दिवस आधीच मोसमी पाऊस दाखल; गेल्या १६ वर्षांत भारतात सर्वात लवकर आगमन
जागतिक माध्यमांवर मोर्चेबांधणी..
एकीकडे आपली माध्यमे आणि सर्व पत्रकार पहलगाम येथील हल्ल्याचे विश्लेषण करत होते, प्रतिसादाची रणनीती ठरवत होते, तोपर्यंत पाकिस्तानने जागतिक माध्यमांवर आपली मोर्चेबांधणी सुरू केली होती. पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पाकिस्तानचे मंत्री इशाक डार, ख्वाजा आसिफ, अत्ताउल्ला तारार आणि ‘पीपल्स पार्टी’ चे प्रमुख बिलावल भुट्टो, बीबीसी, सीएनएन, अल् जझीरा सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांवर २५ पेक्षा जास्त नेते, त्यांचे पत्रकार मुलाखती देत होते. या सर्व मुलाखतींमध्ये एक गोष्ट सातत्याने मांडली जात होती, की या हिंसाचाराचे मूळ कारण काश्मीर आहे, दहशतवाद नाही. आणि मुख्य म्हणजे ही फक्त प्रतिक्रिया नव्हती, तर पूर्वनियोजित प्रोपगंडा मोहीम होती. हल्लेखोर कोण? याऐवजी हल्ला का झाला? याला मुख्य प्रश्न करून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या भूमिकेवरच संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आत्ता एक गोष्ट लक्षात येते की काही प्रमाणात ते यशस्वी देखील झाले आहेत.
‘फेक नॅरेटिव्ह’ वेगाने पसरतो !
आठवा तो, सात मे चा दिवस.. भारताने अखेर ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाक तसेच पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याचे स्पष्ट आणि ठोस पुरावे सादर केले. तरीही प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानला दहशतवाद पोसणारा देश म्हणून नव्हे, तर भारताच्या आक्रमकतेचा बळी म्हणून प्रोजेक्ट केले.. जगाला नेमके काय समजले ? भारतीय हवाई दलाने हल्ला सुरू केल्यानंतर अर्ध्या तासातच, पाकिस्तानी लष्करी जनसंपर्क विभागाने ट्विटरवरून दावा केला की त्यांनी भारताची पाच राफेल लढाऊ विमाने पाडली आहेत. आणि त्याला पुष्टी देण्यासाठी २०२१ मध्ये झालेल्या मिग-२१ अपघातातील जुने फोटो प्रसिद्ध करण्यात आले. परंतु या दाव्यांमागील तांत्रिक तथ्ये महत्त्वाची नव्हती, महत्त्वाचा होता अशा ‘फेक नॅरेटिव्ह’ चा पसरण्याचा वेग !
‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर..
पाकने आपल्या आणि जगातील लोकांची दिशाभूल करण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेल्या बनावट फोटोंमधून , पाकव्याप्त काश्मीरमध्ये कथित नागरिकांचा मृत्यू झाल्याचे चित्र रंगवले. त्यातून निर्माण झालेले भावनिक आंदोलन इतके तीव्र होते, की खोटे फोटो असल्याचे पुढे उघड झाले, तरीही त्याचा परिणाम आधीच झाला होता कारण मानवी मेंदू भावनिक संदेश लवकर स्वीकारतो, हे जगाला माहीत आहेच!
आंतरराष्ट्रीय ‘थिंक टॅंक’ चा वापर
‘आर यु एस आय’ सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या थिंक टँकद्वारे आयोजित वेबिनारमध्ये ब्रिटन आणि अमेरिकेतील निवृत्त लष्करीअधिकाऱ्यांकडून पाकच्या दाव्यांना पाठिंबा मिळवला गेला. हे अचानक घडलेले नाही. या निवृत्त अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवणे, त्यांना आपल्याकडे वळवणे, आणि योग्य क्षणी त्यांच्याकडून हवे ते मतप्रदर्शन करून घेणे, हा त्यांच्या ‘माहिती युद्धनीती’ चा एक भाग होता, त्याची तयारी बरीच आधी सुरू झाली होती.
पाकड्यांनी उभी केली सायबर फौज..
पाकने सुमारे १२ हजारहून अधिक ‘बॉट खात्यां’ ची सायबर फौज उभी करून ‘इंडियालाईज’ सारखे हॅशटॅग जगभरात ट्रेंडमध्ये आणले. केवळ ७२ तासांतच या हॅशटॅग २.३ मिलियन यूज़रनी वापरला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बनावट पण सजीव आणि नैसर्गिक वाटणारे जनमत तयार करण्यात आले. हे हॅशटॅग्स आणि मेसेज इतक्या सफाईदारपणे पसरवले गेले, की हा प्रोपोगंडा नसून सामान्य लोकांचे मत आहे, असा भास निर्माण केला गेला. त्यातही मोठ्या प्रमाणात पाकने बाजी मारली.
संघर्षाचे स्वरूपच बदलले..
‘ऑपरेशन सिंदूर’ हे लढ्याच्या दृष्टिकोनातून एक निर्णायक पाऊल ठरले असले, तरी त्याचबरोबर संघर्षाचे स्वरूप किती बदलले आहे, याची जाणीवही करून देणारे आहे. बंदुका, मिसाईल आणि ड्रोन बरोबरीने परिणामकारक शब्द आणि तातडीचा प्रचार आणि प्रसार हा तितकाच महत्त्वाचा झाला आहे. भारताने या वास्तवाला ओळखून आतापर्यंत ‘माहिती युद्धा’ चे नवे नियम लिहायला सुरुवात केलीही असेल, कारण लढाई यापुढे फक्त सीमेवर नाही, जागतिक नागरिकांच्या मनावर लढवली जाईल. एखादा लढा प्रत्यक्ष जिंकणे, कारवाईमध्ये बाजी मारणे, हे महत्त्वाचे असले तरी यापुढे ‘माहिती युद्धा’ मध्येही भारताला वरचढ व्हायचे आहे, हे लक्षात घेऊन यापुढे व्यूहरचना करायला हवी, त्यातच आपले भले आहे !