लाडक्या बहिण योजनेवरून जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला इशारा
शरद पवारांची राष्ट्रवादी खंबीर, थेट आंदोलनाचा इशारा

अंबरनाथ : “लाडक्या बहिणीची नाव कापल्यास, तुम्ही मतांसाठी महिलांना लाच दिली हे सिद्ध होईल. पण आम्ही योजनेतून नाव कापून देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अंबरनाथमध्ये पार पडलेल्या हळदीकुंकू समारंभात दिला.
राज्यात विधानसभेपुर्वी राबवण्यात आलेली “लाडकी बहीण” योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली असून अनेक लाडक्या बहिणींची नाव अपात्रतेच्या नावाखाली योजनेतून कट करण्यात आली आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या पाहायला मिळत आहेत. “लाडक्या बहिणींची नावं कापल्यास तुम्ही मतांसाठी महिलांना लाच दिली, हे सिद्ध होईल, असे वक्त्यव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात केले.
हेही वाचा : ‘शिवसेनेच्या सातबाऱ्यावर तोतया वारसदारांचे नाव’; भास्कर जाधव यांची टीका
पण आम्ही नावं कापून देणार नाही. सरकारने लाडक्या बहिणींची नावं कापली, तर आम्ही या भगिनींना घेऊन मंत्रालयात घुसू.. त्यांना केबिनमध्ये बसवू आणि मंत्र्यांचं जीणं मुश्किल करून टाकू, अस ही ते यावेळी म्हणाले. अंबरनाथ पूर्व मोतीराम पार्क येथील गणेश मंदिराच्या मैदानात रविवारी (16 फेब्रुवारी) सदामामा पाटील प्रतिष्ठान तर्फे पत्रकार दिनानिमिताने भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंबरनाथमधील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
या समारंभाला ठाणे जिल्हा निरीक्षक ऋता आव्हाड, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा महिला आघाडी विद्या वेखंडे, शहर अध्यक्ष सदाशिव पाटील, महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार, माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी चे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेकडो महिला उपस्थित होत्या.