बिन कामाच्या कामराचा नेमका बोलविता धनी कोण ?

कुणाल कामरा याच्या कथित हास्य-व्यंग विडंबनामुळे गेले दोन दिवस माध्यमे, राजकारणी यांच्या दृष्टीने कारणी लागले. ‘उबाठा गटा’ चे नेते संजय राऊत यांनी कामराचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ शेअर केला आणि व्हायचे तेच झाले..नंतर शिंदे समर्थकांनी अक्षरशः राडा केला.
आदित्य – कामराचे धनिष्ठ संबंध?
या मोहऱ्याचा बोलविता धनी कोण? यावर उद्धव ठाकरे, संजय राऊत हेच बोलवते धनी आहेत, असे सत्तारूढ पक्षाचे मत आहे. स्टुडिओ भाड्यासाठी पैसे दिले आणि ती संहितादेखील उबाठा गटानेच दिली असावी, असा आरोप आता होत आहे. यातील तथ्य किती, हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा. मात्र, आदित्य ठाकरे यांचे आणि कुणाल कामरा याचे घनिष्ठ संबंध आहेत, याची पुष्टी देणे सुरु आहे.
लक्ष विचलित करण्याची ‘दिशा’..
हे प्रकरण काही असले तरी दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरे गटाने हा उद्योग केला आहे, असे नितेश राणे यांचे म्हणणे आहे. तसे ते सत्तारूढ पक्षातील अनेकांचे म्हणणे आहे. आता, पुन्हा गंमत अशी आहे की , हे सत्तारूढ आणि विरोधी हे दोन्ही पक्ष दर दोन दिवसांनी एकमेकांवर लक्ष विचलित करत असल्याचा आरोप करत आहेत. म्हणजे सरपंच देशमुख यांची हत्त्या, महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, कृषी मालाचे दर, टोल अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपा, मित्रपक्षांना जनता आणि विरोधकांचे लक्ष हटवायचे होते, म्हणून औरंगजेब, दिशा सालियन आदी प्रकरणे काढली. हा आरोप अर्थातच विरोधी पक्षांचा आहे. तर दिशा सालियन प्रकरण अंगाशी आल्यामुळे ठाकरे आणि मित्रपक्षांना कुणाल कामराचा विषय सुरु केला, असे महायुतीचे म्हणणे आहे. कराड वरून लक्ष हटवण्यासाठी आरक्षण , जरांगे आणले. तर जरांगे याच्यावरून विषय बदलावा म्हणून वाल्मिक कराड आणि देशमुख यांचे प्रकरण सुरु झाले.
मग अधिवेशन नेमके कशासाठी?
आता हे सगळे विषय एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे लक्ष पांगवण्यासाठी असतील, तर अधिवेशन कोणासाठी आणि का चालवले जात आहे ? अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक मुद्द्यांवर किती चर्चा झाली ? विरोधक आर्थिक मुद्यांवरून सरकारला घेरण्यासाठी किती सज्ज आहेत ? सभागृहात नसलेली, प्रवक्ते मंडळी पक्षाची भूमिका मांडताना किती सवंग बोलतात, हे वारंवार दिसत असताना जनतेने दररोज तोच तो मौखिक ,मानसिक अत्याचार सहन का करायचा असा प्रश्न पडतो.
हेही वाचा – अवैध धंद्याना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी भाजपचे आंदोलन
मुख्य मुद्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा..
आता मुद्दा येतो तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ! कुणाल कामरा हा कलाकार आहे का ? असा प्रश्न त्याचे व्हीडिओ पाहून मनात येतो. (अनेकांना तो आज समजला.) सुमार दर्जाचा त्याचा कार्यक्रम मुंबई आणि महानगरातली मंडळी पैसे देऊन का पहातात, हे कळत नाही. त्यात ना दर्जा, ना पातळी, ना विचार, ना संकल्पना, ना विषयाचे गांभीर्य.. अशा या कलाकाराचे कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून नाही तर दर्जाशून्य कार्यक्रम म्हणून थांबवले पाहिजेत. इतक्या उथळ आणि फालतू कार्यक्रमांनी शिंदे समर्थकांनी अस्वस्थ व्हायचे कारण नव्हते. कुणाल कामराला जो पर्यंत चांगला कार्यक्रम तुझ्याकडून होत नाही, तो पर्यंत कार्यक्रम कर, अशी सक्ती करायला पाहिजे होती. मारहाण आणि तोडफोड करण्यापेक्षाही शिक्षा जास्त होती.
राजकारणाची दया येऊ लागते!
..आणि समजा खरंच सुपारी घेऊन त्याने बदनामीचे कार्यक्रम करण्यापेक्षा खरोखर मनोरंजन करणे अधिक योग्य होते. केवळ व्यक्तिगत बदनामी हा हेतू कुणाल कामराच्या त्या सादरीकरणात आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनीच, त्यांच्या समर्थकांनी शिंदेच गद्दार असल्याचे कामराच्या गाण्यांनी सिद्ध केले असे म्हणतात. तेव्हा एकूणच राजकारणाची दया यायला लागते. (एका नेत्याबद्दल समाजमाध्यमांवर फिरत असलेली पोस्ट रिपोस्ट केली म्हणून एका महिला कलाकाराची धिंड गावोगावी काढली होती . गुन्हे नोंदवले होते, हे जरा आठवा. आदित्य ठाकरे यांच्या आठवणीसाठी.)
नेमकी गद्दारी कोणाची ?
गद्दारी कोणी केली, याचा मागोवा घेतला तर कथा उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाईल. सन २०१९ मध्ये ‘युती’ ला मतदारांनी निवडून दिले असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाण्यात इमानदारी होती का ? भाजपा ने फसवले, असे गृहीत धरले तर तो त्या दोन पक्ष प्रमुखांचा मामला होता. बंद खोलीत पक्ष आणि मतदारांचे भवितव्य ठरवणारे ठाकरे कोण ? अमित शहा यांच्या बरोबर बैठक मोकळ्या मैदानात करायची होती आणि तरी वाटाघाटीत जमले नव्हते, तर स्वतंत्र राहायचे होते. काँग्रेसशी आणि राष्ट्रवादीशी गळ्यात गळा घायलायचे कारण काय होते ? बंद खोलीत कोणते इतर मुद्दे चर्चेत घेतले, हे सांगायचे उद्धव ठाकरे यांनी आजअखेर कधीच कष्ट घेतले नाहीत. केवळ मुख्यमंत्रीपदाचा एकच मुद्दा बोलला गेला का ? हे कधीतरी स्पष्ट करावे. आता आजच्या सगळ्या राजकारणी मंडळींनी गद्दारी हा शब्द कोणाही साठी वापरू नये.
तत्त्व, नीती, आचरण, विचार… बासनात..
तत्व, नीती, आचरण, विचार यात प्रत्येकाने गद्दारी केली आहे. उगीच एकनाथ शिंदे गद्दार म्हणणे फारसे शहाणपणाचे नाही. पुन्हा एकदा राजकारणाच्या आजच्या विस्कटलेल्या घडीला केवळ आणि केवळ २०१९ सालात शरद पवार यांनी ज्या प्रकारे मोट बांधली आणि राजकारणाचा प्रवाह गढूळ केला, ते जबाबदार आहेत. कुणाल कामरासारखे फुटकळ कलाकार (?) राज्यसत्ता उलथवून टाकण्याच्या लायकीचे काही करत आहेत, असे म्हणणे म्हणजे आपल्या बुद्धीचे दिवाळे निघाले आहे असे जाहीर करणे होय…कामरा हे फुटकळ व्यक्तिमत्व आहे. त्याची लायकी, कर्तृत्व ,कलाकारी नगरसेवक पाडण्याचीही नाही. शिंदे यांनी ठाकरे यांच्याशी पंगा घेतला होता, तिथे त्यांना हा कामरा फार मोठा स्पर्धक नाही. कामराच्यात अजून बरीच परिपक्वता यायची आहे हे नक्की! सध्या तो बिन कामाचा आहे. आणि त्याला पाठिंबा देणारे रिकामे आहेत..
सबब राज्यात कामराच्या फुटकळ कार्यक्रमापेक्षा महत्वाचे विषय खूप आहेत. त्यावर विचार आणि कृती करावी, त्यात सर्वांचे भले आहे!