अवैध धंद्याना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी भाजपचे आंदोलन

सांगली : पोलीसांच्या आशीर्वादाने इस्लामपूर अवैध व्यवसाय सुरू असल्याने पोलीस अधिकार्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी इस्लामपूर तहसिल कार्यालयाच्या प्रवेशदारावर आंदोलन केले. यावेळी आत्मदहनापासून आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीसांनी बळाचा वापर करताच झटापटही झाली. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी केले.
इस्लामपूर शहरात अवैध व्यवसाय, चोरटी मद्य विक्री, जुगार सुरू असून या अवैध व्यवसायाला पोलीसांचा छुपा पाठिंंबा असल्याची तक्रार श्री. पाटील यांनी काही दिवसापुर्वी पोलीस अधिक्षकांकडे केली होती. तक्रारीच्या पुष्ठत्यार्थ त्यांनी मटका चिठ्ठ्याही सोबत जोडल्या होत्या. दि. २४ मार्चपर्यंत पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांची बदली न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला होता. या आरोपाचा पोलीसांकडून इन्कार करत असताना गेल्या काही दिवसापासून अवैध व्यवसायावर किरकोळ कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र, अधिकारी हारूगडे यांच्या बदलीसाठी भाजपचे पाटील ठाम होते. भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा आशा पवार यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता.
हेही वाचा – “कुणाल कामराचे सीडीआर तसेच बँक खात्याची चौकशी होणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली घोषणा
या इशार्यानुसार भाजप कार्यकर्त्यांनी आज तहसिल कार्यालयासमोर आंदोलन केले यावेळी त्यांनी सोबत आणलेले डिझेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी आंदोलकांच्या हातातून कॅन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. आंदोलकांनी वरिष्ठ अधिकार्यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून शब्द द्यावा असा आग्रह धरला होता. पोलीस आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते, तर महिला आंदोलक अंगाला हात लावायचा नाही असे बजावत होत्या. हा गोंधळ सुमारे दीड तास सुरू होता. अखेर पोलीसांनी आंदोलकांना बळाचा वापर करत ताब्यात घेतले. यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेउन सोडून देण्यात आले.