इंदुरीकर महाराजांचा विरोध तरी देखील सासूचा भाजपात प्रवेश

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या त्या संरपंच आहेत. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकीत त्या अपक्ष विजयी झाल्या आहेत. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला आहे.
अपक्ष उमेदवारी लढवत असताना देखील लोकांनी विश्वास टाकला. गावच्या लोकांमुळेच निवडूनही आले. निवडणूक लढवत असताना जनतेसाठी काही कामं करण्याची आश्वासने दिली होती. ती सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी भाजपात प्रवेश केला, असं शशिकला पवार म्हणाल्या.
राजकारण हे माझं क्षेत्र नाही, मी गावाच्या विकासासाठी राजकारणात आले. आम्ही वारकरी आहोत. मी निवडणुकीत उभं राहण्याला इंदुरीकर महाराजांचाही विरोध होता. आपलं क्षेत्र वेगळं आहे. कितीही चांगलं काम केलं तरी यात शिंतोडे उडवले जातात, त्रास दिला जातो, असं महाराज म्हणत होते. मात्र, सर्वसामान्य जनतेसाठी मी स्वतः हा निर्णय घेतला, असं शशिकला पवार सांगितले.
आता सेवा करायची संधी मिळाली आहे, तर प्रामाणिकपणे सेवा करा आणि संधीचं सोनं करा. यात मान-अपमान समान धरायचं. कोणी बोललं तरी ते सहन करा. सामान्य जनतेने तुमचा हात धरला, त्या हाताला धोका देऊ नका, असं इंदुरीकर महाराज म्हणाले अशी माहिती शशिकला पवार यांनी दिली.





