आरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तिळाचा वापर आपल्या स्वयंपाकघरात नियमित करणे उत्तमच

तीळ शरीराला बल देतात, केसांसाठी अत्यंत हितकारी

महाराष्ट्र : हिवाळ्यात बाहेरचे वातावरण गार असते, त्यामुळे आहारात थोड्या प्रमाणात उष्ण गोष्टींचा समावेश करणे अपेक्षित असते. त्याचाच परिणाम म्हणून तीळ, गूळ, केशर, यांचा वापर या काळात जास्ती प्रमाणात झालेला दिसतो. मकरसंक्रांत जणू या गोष्टीची आठवण घेऊन येत असते. तसेही तिळाचा वापर आपल्या स्वयंपाकघरात नियमित करणे उत्तमच असते. तीळ रसात थोडे कडवट, मधुर व कषाय असतात, तसेच गुणांनी स्निग्ध व उष्ण असतात व ते कफ व पित्त कमी करायला मदत करतात. तीळ शरीराला बल देतात, केसांसाठी अत्यंत हितकारी असतात.

तीळ त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम असतात, शरीरात कुठेही व्रण झालेला झालेला असल्यास लाभकारी असतात, दातांसाठी उत्तम असतात, दीपनीय व मेध्य असतात. आयुर्वेदात तिळाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केलेला दिसतो. सर्व प्रकारच्या सिद्ध तेलांमध्ये तिळाच्या तेलाचा वापर केलेला दिसतो. सिद्ध केलेले तीळ तेल अभ्यंगासाठी तर उपयोगी ठरतेच, पण बस्ती, शिरोबस्ती वगैरे बाकी इतर थेरपींसाठीही तिळाचे तेल वापरणे उत्तम सांगितलेले आहे. अर्शाची समस्या असलेल्यांना रक्तस्राव होत असल्यात तीळ पाण्यात भिजवून त्याचा बनविलेल्या कल्कात लोणी मिसळून २-३ दिवस जेवणाआधी घेतल्यास रक्त पडणे बंद होते असा अनेकांचा अनुभव आहे.

तीळ केसांच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जातात. असे म्हटले जाते की काळ्या तिळाचे तेल केसांना लावले तर केस अकाली पांढरे होत नाहीत, ते काळे, दाट व मऊसर राहतात.

एकूणच आरोग्याच्या दृष्टीने तीळ आपल्या स्वयंपाकघरात नेहमी असावेत. मसाल्यांमध्ये कांदा व लसणाचा वापर करण्यापेक्षा वेगवेगळ्या बियांबरोबर तीळ वापरणेही चांगले असते.

भाजलेले तीळ, भाजलेले सुके खोबरे व कढीनिंब, सुक्या लाल मिरच्या वगैर घालून केलेली तिळाची चटणी खाणे उत्तम.

बरोबरीने तिळाचे लाडू, तिळाची चिक्की या ऋतूत नियमितपणे खाणे उत्तम.

या काळात मटार, गोराडू, सुरण, सुरती पापडी, पांढरी पापडी, गाजर, वांगी, लसणाची पात वगैरे ताज्या भाज्यांनी बाजारपेठा सज्ज असतात. संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी या सगळ्या भाज्यांची मिश्र भाजी करण्याची आपल्याकडे पद्धत आहे, यातही तिळाचे वाटण महत्त्वाचे असते. या काळात ग्रामीण भागात उंधियूसारखी भाजी किंवा माठात केला जाणारी पोपटी करण्याची पद्धत रूढ आहे.

अशा प्रकारच्या भाज्या या काळात नक्की कराव्या. भोगीच्या दिवशी आई तीळ दुधात भिजवून त्याचे वाटण करून मुलीच्या अंगाला व केसांना लावते. आयुर्वेदानुसार तीळ त्वचेसाठी व केसांसठी उत्तम समजले जाते. त्यामुळे कदाचित ही पद्धत रूढ झाली असावी. पण फक्त भोगीच्या दिवशी याचा वापर न करता वेळ मिळेल तेव्हा असे वाटण करून लावण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो.

या काळात ओली हळद व ओली आंबेहळद बाजारात उपलब्ध असते. ओली हळद, ओली आंबेहळद, आले, लिंबू, मीठ व आवडत असल्यास हिरव्या मिरचीचे तुकडे व सैंधव यांच्यापासून केलेले लोणचे पचनासाठी उत्तम असते. तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारचे लोणचे नंतर वर्षभरही थोड्या प्रमाणात खाता येते.

या काळात शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित राहणे आवश्यक असते, तसेच या काळात सर्दी, खोकला, दमा वगैरे त्रास होताना दिसतात. या सगळ्या त्रासांवर आलेपाक हा सोपा व घरगुती उपाय आहे. आल्याच्या रसात साधारण दुप्पट साखर घालून शिजवावे.

यात आवश्यक असल्यास थोडे पाणी घालता येते. पाक तयार झाला की त्यात केशर, वेलची, जायफळ, लवंग यांचे चूर्ण घालावे, ताटाला थोडे तूप लावून त्यावर मिश्रण ओतून वड्या पाडाव्या. असा आलेपाक दिवसातून २-३ वेळा थोडा थोडा खाल्ल्यास उपरोक्त सर्व त्रासांमध्ये मदत मिळू शकते. या काळात घरी केलेले डिंकाचे लाडू, अहळिवाचे लाडू, वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या, मोहनथाळ, उडदाचे लाडू, खोबरे पाक खाणे उत्तम असते. आहाराची अशा प्रकारे काळजी घेतल्यास थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ऊब नीट राहायला व पचन नीट व्हायला मदत मिळू शकेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button