मकर राशीची साडेसाती संपत आली, संघर्षाचा कालावधी संपुष्टात
'मकर राशी'च्या व्यक्तींसाठी कसे असेल नवीन वर्ष?
महाराष्ट्र : मकर राशीची साडेसाती संपत आली आहे. त्यामुळे जाता जाता फळ मिळण्याची शक्यता आहे. संघर्षाचा कालावधी संपुष्टात येऊन अनेक उत्तम गोष्टी आयुष्यात घडण्यास वेग येईल. नोकरीमध्ये (Job) बढतीचे योग आहेत. मार्चनंतर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होईल. गोष्टी सोप्या होत जातील. फक्त त्या पारखून घेण्याची नजर ठेवावी लागेल. व्यापार वृद्धीसाठी उपयुक्त कालावधी सुरू होत आहे. उच्च शिक्षणासाठी संधी उपलब्ध होऊ शकतात. किरकोळ प्रकार वगळता तणाव कमी होईल. मनावरील ओझे उतरल्याची भावना असेल.
जानेवारी : आर्थिक लाभ होतील. आरोग्याची (Health) काळजी घ्यावी. गुरू महाराजांबरोबरच राहू, मंगळ व शुक्र यांचेही पाठबळ आहे. चालू कामे पूर्ण होतील. प्रवासाचे योग दिसत आहेत. व्यवसायात आत्मविश्वासाने कार्य करा. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत व्याप वाढू शकतो. काम वाढणार आहे. ते काम वेळेत पूर्ण करणे हितावह. खर्च वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यातून अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. कौटुंबिक सौख्य बरे राहील. गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहे. संगीत, नाटक, वाचन यात रस घ्याल.
महिलांनी मोठा निर्णय घेताना घाई करू नये. विचारपूर्वक पावले टाकावीत. पारिवारिक कार्यामध्ये व्यस्त राहाल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे; पण श्रम करावे लागतील याची नोंद घ्यावी. उपासनेत सातत्य ठेवा.
अनुकूल दिवस
३, ४, ६, ७, १०, १२, १३, १९, २१, २२, २४, ३१
फेब्रुवारी : एखाद्या शुभकार्याची सुरुवात या महिन्यात होऊ शकेल. प्रतिष्ठित लोकांची ओळख होऊ शकेल. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी यात्रा घडू शकेल. घरात महागड्या वस्तूचे आगमन होण्याचे योग आहेत. मित्रपरिवार सहकार्य करेल. पहिले पंधरा दिवस आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य कमी प्रमाणात लाभू शकेल; पण आपल्या सन्मानात वाढ होईल. व्यवसायात अचानक धनलाभाचे योग आहेत. नवनवीन योजना बनवू शकाल.
महिलांसाठी साहित्य, संगीतात रुची उत्पन्न होईल. मन प्रसन्न राहील. भावंडांसोबत ताळमेळ चांगला राहील. मन प्रसन्न राहील.
विद्यार्थ्यांसाठी सामान्य शुभ काळ आहे. ऐन परीक्षेत आजारपण येणार नाही याची काळजी घ्यावी.
अनुकूल दिवस
२, ३, ८, १०, १६, १७, १८, १९, २०, २१, २७, २८
मार्च : मान सन्मान मिळण्याचे दिवस आहेत. शनि मीनेला तृतियेत जातो आहे. साडेसाती संपत आहे. जाता जाता शनि महाराज आपल्याला आर्थिक लाभ देऊन जातील. नोकरीत काही बरे-वाईट प्रसंग येतील. समजूतदारपणा दाखवावा लागेल. व्यवसायात मध्यम परिस्थिती राहील असे दिसते. ताण व अतिविचार टाळा. संपत्तीच्या खरेदी- विक्रीसाठी सामान्य काळ आहे. विवेकाने निर्णय घ्यावा. हितशत्रूंपासून सावध राहा. काही जणांना परदेशी जाण्याचा योग लाभू शकतो. भावंडांचे सुख लाभेल. स्वतःच्या पराक्रमाने कार्यसिद्धी कराल.
महिलांनी घरातील लहानग्यांची काळजी घ्यावी. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना तूर्तास पुढे ढकला. त्याची तयारी करण्यासाठी वेळ घ्या.
विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला काळ आहे. प्रामाणिक कष्ट घेतले असल्यास उत्तम फलप्राप्ती होईल असे दिसते.
अनुकूल दिवस ः १, २, ३, ६, ७, ९, १४, १५, १६, १७, १८, २०, २६, २९, ३०
एप्रिल : मनापासून देवधर्म कराल. ग्रहमानाची साथ राहील. अडकलेली कामे मार्गी लागण्याचे योग आहेत. व्यवसायात संघर्ष करूनच आर्थिक प्राप्ती होईल. नवीन ग्राहक वर्ग निर्माण होतील. जिभेवर साखर ठेवा. नोकरीत सहकाऱ्यांशी व्यवहार करताना रागावर नियंत्रण ठेवावे. अल्पसंतुष्टी न बाळगता अधिक श्रम घेतल्यास वातावरण बरे राहील. छोटी गुंतवणूक करू शकता. जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग आहेत. जोडीदाराची काळजी घ्यावी. संपत्तीची खरेदी-विक्री करण्यासाठी उत्तम काळ; पण घाई नको.
महिलांनी घरातील सदस्यांशी व्यवहार करताना संयम बाळगावा. स्वतःसाठी काही खरेदी कराल. बोलताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
विद्यार्थ्यांसाठी फार अनुकूल काळ नाही. अभ्यासात मन गुंतवावे लागेल. वेळ वाया घालवू नये.
अनुकूल दिवस ः २, ३, ५, ११, १२, १४, १६, २३, २४, २५, २६, २९, ३०.
मे : आर्थिक प्राप्ती चांगली झाल्याने अडचणींवर मात करू शकाल. षष्ठातील मिथुनेचे गुरू महाराज आरोग्यास चांगले आहेत. संघर्ष करावा लागेल; पण शेवटी कार्यसिद्धी होईल. योजनाबद्ध पद्धतीने काम केल्यास लाभ होईल असे दिसते. व्यवसायात परिस्थिती सुधारेल. मोठी आर्थिक उलाढाल होण्याचे योग आहेत. नोकरीत सामान्य शुभ परिस्थिती असेल असे दिसते. वरिष्ठांशी संबंध ताणू शकतात. कोर्ट कचेरीत पैसा खर्च होईल असे दिसते. अडकलेली सरकारी कामे पूर्ण होण्याचे योग आहेत. आरोग्य चांगले राहील.
महिलांना नवीन आर्थिक मार्ग सापडू शकेल. दगदग होईल; पण संधी मिळतील. जोडीदाराशी ताळमेळ व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी.
विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. अति आत्मविश्वास टाळलेला बरा. आई-वडिलांशी मतभेद संभवतात.
अनुकूल दिवस ः १, २, ८, ९, १०, १३, १४, २१, २३, २४, २५, २६, २७, २८, ३०
जून : कौटुंबिक सुख राहील. पूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे अथवा गुंतवणुकीचे फळ मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभण्याचे योग आहेत. भौतिक साधनांवर खर्चाची शक्यता आहे. संगीत, नाटक इ. गोष्टींमध्ये रुची निर्माण होऊन एखाद्या मैफलीचा आनंद घ्याल. नोकरीत त्रास संभवतो. वादाचे कारण बनणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायात चांगले वातावरण. भागीदारीत संयम दाखवावा लागेल. धार्मिक ठिकाणी यात्रेचे योग, प्रवासात मौल्यवान गोष्टी सांभाळा. वाहने सावकाश चालवा. आर्थिक नियोजन आवश्यक आहे.
महिलांना सामान्य शुभ काळ आहे. अति विचार, ताण घेणे टाळा. त्याचा प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.
विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. चांगली संगत ठेवा. व्यसनांपासून दूर राहा.
अनुकूल दिवस
४, ५, ६, ८, ९, १०, १६, १७, १९, २३, २४, २५, २६
जुलै : जवळच्या प्रवासाचे योग आहेत. आरोग्य बरे राहील. कुटुंबातील सदस्यांशी ताळमेळ ठेवावा लागेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. जमीन – घर वगैरेमध्ये गुंतवणुकीस अनुकूल काळ. सावधगिरीने व्यवहार करा. आई-वडिलांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होण्याचे योग आहेत. आपल्या हातून एखादे धार्मिक अनुष्ठान घडू शकेल. व्यवसायात नवीन काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. नोकरीत परिस्थिती सामान्य राहील. हितशत्रूंपासून सावधान. जोडीदाराशी संबंध उत्तम राहतील. मुलांचे मानसिक आरोग्य जपा.
महिलांसाठी माहेरून एखादी चांगली बातमी कानावर येऊ शकेल. वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. नव्या ओळखी होतील.
विद्यार्थ्यांसाठी बरा काळ आहे. नवीन मित्र बनवताना काळजी घ्या. माणूस पारखून घेण्याची सवय बाळगा.
अनुकूल दिवस ः १, २, ३, ४, ५, ७, १४, १६, १७, २१, २२, २४, २८, ३०, ३१.
ऑगस्ट : प्रवासाचे योग आहेत. मानसिक स्वास्थ्य सुधारेल असे दिसते. व्यवसायात महिन्याच्या सुरुवातीला चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत आपल्या कामाशी काम ठेवा. वादात पडू नका. त्रास संभवतो. आरोग्याच्या लहान तक्रारी जाणवतील. आर्थिक प्राप्ती चांगली असेल; पण खर्च देखील वाढेल असे दिसते. स्थावर खरेदी-विक्रीसाठी तितकासा अनुकूल काळ नाही. यासंबंधीची योजना पुढे ढकललेली बरी राहील. मधुर वाणीने बरीच कामे मार्गी लागू शकतात. भावंडांचे सहकार्य चांगले लाभेल.
महिलांनी घरातल्या ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. घरी अथवा कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढू शकतो. जोडीदाराशी असलेले मतभेद संपवण्यासाठी पुढाकार घ्याल.
विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. अभ्यासात गोडी निर्माण होईल. छंदालाही वेळ द्याल. उपासना वाढवा.
अनुकूल दिवस ः २, ३, १०, १२, १३, १७, १९, २०, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१
सप्टेंबर : गुरू, शुक्र व शनि शुभ आहेत. आत्मविश्वासाने काम कराल. कोणावर अति विश्वास ठेवू नये. नोकरीत कष्ट वाढतील. क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायात चांगला लाभ मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. सकारात्मक विचार मनी बाळगून आळस दूर ठेवल्यास चांगले फळ मिळेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. काळजी घ्यावी. नवी जमीन, घर, वाहन घेण्यासाठी फारशी अनुकूल परिस्थिती नाही. आई – वडिलांचे प्रेम व सहकार्य लाभेल. सामाजिक प्रतिष्ठेत वृद्धी होण्याचे संकेत आहेत.
महिलांची दगदग वाढेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणखी चांगल्या पद्धतीने निभावणे गरजेचे आहे. पोटासंबंधी आरोग्याची तक्रार जाणवेल.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मेहनत कराल तर यश नक्की लाभेल हे ध्यानात ठेवा.
अनुकूल दिवस ः ६, ७, ९, १०, १३, १४, १५, १६, १७, २१, २२, २४, २५, २७
ऑक्टोबर : प्रवासाचे योग दिसतात. ग्रहमानाचे पाठबळ आहे. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. स्त्रीधनाची प्राप्ती होऊ शकते. नोकरीत कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. काही घटना मनाविरुद्ध घडतील. संयम बाळगणे आवश्यक होय. नवीन नोकरीचा शोध मात्र पूर्ण होऊ शकतो. व्यवसायात आर्थिक लाभाचे योग नसले तरी मेहनत वाढेल. सहकारी, नोकर यांच्याशी सबुरीने वागा. मोठे निर्णय घेताना खबरदारी घ्या. गुंतवणुकीच्या दृष्टीने स्थावर घेऊ शकता. त्यातून भविष्यात लाभ शक्य. डोळ्यांची काळजी घ्यावी.
महिलांना सामान्य शुभ काळ असून बोलताना काळजी मात्र घ्यायला हवी. आपल्या बोलण्याने कोणी दुखवणार नाही हे पाहावे.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सामान्य काळ आहे. एकाग्रता वाढण्यासाठी व्यायाम, योगासने केल्यास लाभ होईल.
अनुकूल दिवस ः ४, ६, ७, ११, १२, १३, २०, २२, २४, २८, ३१
नोव्हेंबर : तीर्थयात्रा घडण्याचे योग दिसत आहेत. आर्थिक बाजू भक्कम होईल. परिवारातील उपवर-वधूंचे विवाह सहज जुळून येतील. व्यवसायात आर्थिक आवक वाढेल. जोडधंद्याची सुरुवात अथवा त्यात गुंतवणूक करणार असाल तर चांगला काळ आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कामाचे कौतुक होईल असे दिसते. आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः दूषित पाणी व उघड्यावरचे अन्नपदार्थ बाधू शकतात. जमीन किंवा वाहन खरेदीसाठी चांगला काळ. काही कार्यात विलंब संभवतो. जोडीदाराशी जुळवून घ्या.
महिलांनी शारीरिक व मानसिक दगदग टाळावी. एखाद्या चैनीच्या वस्तूची खरेदी करण्याचे योग आहेत; मात्र आधी खिशाचा सल्ला घ्या.
विद्यार्थ्यांचे मन विचलित होऊ शकेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. संगत चांगली ठेवा.
अनुकूल दिवस ः ३, ४, ७, १०, १५, १६, १७, १८, २१, २७, २८, ३०
डिसेंबर : प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख होण्याचे योग आहेत. आनंदी प्रवास घडण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च टाळा. व्यवसायात जुनी उधारी वसूल होऊ शकते. भागीदाराला विश्वासात घेऊन कार्य करा. आर्थिक आवक उत्तम राहील. महिन्याच्या शेवटी अधिक लाभ दिसतो. नोकरीत काहींना बढतीचे योग. हितशत्रूंपासून सावधान. अचानक धनलाभाची शक्यता. घरात धार्मिक अनुष्ठान वा मंगलकार्याचे आयोजन होऊ शकेल. कोर्ट कचेरीत मानसिक त्रास व खर्च होण्याची शक्यता. जमीन व्यवहारात आर्थिक लाभ शक्य.
महिलांनी घरातील लहानग्यांची काळजी घ्यावी. पूजा-अर्चेत मन कमी लागेल. मनःस्वास्थ्य राखण्यासाठी नियमित योगा केल्यास फायदा.
विद्यार्थ्यांसाठी सामान्य काळ आहे. अभ्यास वाढवावा लागेल. वडीलधाऱ्यांचा आदर करावा.
अनुकूल दिवस ः ४, ५, ७, १२, १३, १४, १६, १७, २०, २१, २७, २८, ३०