महाराष्ट्र

अखेर अजित पवार-भुजबळ दिलजमाई; तब्बल ८ वर्षांनंतर येवल्यात एकत्रित कार्यक्रम

नाशिक |  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यातील नव्या ‘केमिस्ट्री’चा अनुभव सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच राजकीय वर्तुळातील अनेकांनी नाशिक दौऱ्यात घेतला.

अजित पवार व भुजबळ या दोन नेत्यांमध्ये फारसे सख्य तर कधी नव्हतेच; शिवाय संभाषणही अपवादात्मक परिस्थितीत ते करीत. येवल्यातील त्यांचा एकत्रित दौराही आठ वर्षांनंतर झाला. या पार्श्वभूमीवर प्रदीर्घ काला‌वधीनंतर पक्षातील दोन ज्येष्ठ नेते जवळ आल्याने ‘राष्ट्रवादी’तील नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार व भुजबळ यांचे नाशिक व येवला मिळून एकत्रित तीन कार्यक्रम झाले. दोघांमध्ये दिलखुलास गप्पाही चाललेल्या पाहायला मिळाल्या. भुजबळ ‘सीनिअर पवारां’चे सहकारी. ‘राष्ट्रवादी’कडे उपमुख्यंत्रिपद प्रथम चालत आले, तेव्हा या पदासाठी या दोघांमध्येच संघर्ष झाला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तेव्हा आमदारांशी व्यक्तिगत चर्चा करून मते आजमावली होती. तेव्हा अजितदादांबरोबर बव्हंशी आमदार असल्याची चर्चा असताना भुजबळांकडे हे पद गेल्याने हा संघर्ष तीव्र झाला. नंतरच्या काळातही उभयतांमध्ये कधी जवळीक झालेली कोणी पाहिली नव्हती. त्यामुळेच अजित पवार निफाड, पिंपळगाव बसवंत, सिन्नर आदी भागात अनेकदा कार्यक्रमांनिमित्त आले; परंतु येवल्यात कधीही पक्षाच्या कार्यक्रमास आले नव्हते.

पक्षातील दादासमर्थक कामांसाठी जात तेव्हा त्यांनाही नाशिकची जबाबदारी भुजबळांकडे असल्याने त्यांच्याशीच बोला, असे अजित पवार सांगत असत. त्यामुळेच माजी खासदार देवीदास पिंगळेंपासून अनेकांना नंतर भुजबळांशी जुळवून घ्यावे लागल्याचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिवसभर पवार व भुजबळ यांची देहबोली व त्यांच्यातील सहजभाव जुने-जाणते नेते व कार्यकर्त्यांना सुखावून गेला.

‘राष्ट्रवादी’लाही येईल बहर…

भुजबळ आणि पवार यांनी एकत्रितपणे प्रथमच राष्ट्रवादीच्या शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दोन तास दिले. भुजबळ-पवार यांच्यातल्या या दिलजमाईने राष्ट्रवादी कार्यालयालादेखील प्रथमच बहर आल्याचे वातावरण दिसून आले. कधी नव्हे एवढी कार्यकर्त्यांची गर्दी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जमली होती. त्यामुळे पोलिसांना रस्ताच बंद करावा लागला होता. या दोन नेत्यांमध्ये राजकीय दिलजमाई झाल्यास जिल्ह्यासह शहरातही राष्ट्रवादीला चांगला बहर येईल, अशी चर्चा या वेळी कार्यकर्त्यामध्ये रंगली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button