breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या सुरूच

अजित पवार यांची टीका; जलयुक्त शिवार योजनाही अपयशी ठरल्याचा आरोप

दुष्काळावर मात करण्यासाठी मोठा गाजावाजा करत आणलेली जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरली असून टँकरची संख्या वाढतच आहे. १९ हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी देऊनही रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच असून सरकारला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला एक लाखांऐवजी पाच लाख रुपयांची मदत करा आणि दुधासाठी दिलेले पाच रुपयांचे अनुदान पावसाळा सुरू होईपर्यंत कायम ठेवा, अशी मागणीही त्यांनी केली.

विधानसभेत दुष्काळावरील चर्चेत अजित पवार बोलत होते. कधी सरकारवर टीकेचे आसूड ओढत तर कधी मंत्र्यांना मिश्कील चिमटे काढत अजित पवार यांनी दुष्काळामुळे राज्यातील ग्रामीण भागात निर्माण झालेल्या समस्या आणि शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाची कैफियत मांडली. पाण्याची टंचाई असल्याने टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यात दुधाच्या दराचे आंदोलन पेटल्यानंतर पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते. पण अनेकदा ते देण्यात विलंब होत आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता पावसाळा सुरू होईपर्यंत सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. सरकारने अनुदान सुरू न ठेवल्यास राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. तहान लागल्यावर विहीर खणण्याचा राज्य सरकारचा कारभार असून डोकी फिरली आहेत का, असा सवाल त्यांनी मंत्र्यांना केला.

नोटाबंदीचा फटका देशातील २६ कोटी शेतकऱ्यांना बसल्याची कबुली खुद्द केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.

‘ढाण्या वाघा’ची ‘अवनी’ झाली: अजित पवार यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या मंत्र्यांना अनेकदा चिमटे काढले. राजीनामे खिशात आहेत, असे शिवसेनेचे मंत्री म्हणत होते. ते थोडे बाजूला ठेवले तरी दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्राला तातडीने मोठी मदत मिळालीच पाहिजे यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला हवी. त्याचबरोबर महाराष्ट्राला मदत न मिळाल्यास केंद्र सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा द्यायला हवा. तसे झाले तर राज्यातील जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. पण शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पार ‘अवनी’ झाली आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button