विकी कौशलने मराठीतून सादर केली कविता, “पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…”
महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा

मुंबई : आज संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. या मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील दादर परिसरात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मनसेकडून एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने कवितांची मैफीलही रंगली. यावेळी राज ठाकरे, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे, आशा भोसले, नागराज मंजुळे यांसह अनेक दिग्गज उपस्थित होते. या सर्व दिग्गजांनी विविध कविता सादर केल्या. यावेळी अभिनेता विकी कौशलने मराठीतून कविता सादर केली.
यावेळी विकी कौशलने कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविता सादर केली. त्यासोबत त्यांनी राज ठाकरेंचे या कार्यक्रमाचे आमंत्रण दिल्याबद्दल आभारही मानले. “इथे एक एक लोक कविता सादर करत होते. त्यावेळी आशा मॅम यांनी खूपच घाबरत माझ्याकडे पाहिले आणि त्यांनी मला विचारले की तू पण कविता वाचणार आहेस का? मी त्यांना सांगितले हो… त्यांनी परत विचारले मराठीत? मी म्हटलं हो…त्या म्हणाल्या तोबा तोबा…. मी प्रयत्न करतो. कवितेचे नाव कणा.. राज ठाकरेंनी जेव्हा मला सांगितलं की कुसुमाग्रज यांची एक कविता कणा तुम्हाला म्हणायची आहे. मी त्यांना विचारले सॉरी पण कणा याचा अर्थ काय असतो. त्यावर त्यांनी म्हटलं कणा म्हणजे स्पाईन… छावा हा चित्रपट केल्यानंतर मला या शब्दाचा अर्थ समजला”, असा किस्सा विकी कौशलने सांगितला.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत
विकी कौशलने सादर केलेली कविता
ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरटयात राहून
माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी माञ ठेवले
कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा…
विकी कौशलचे अस्खलित मराठीतून भाषण
विकी कौशलने मराठीतून त्याच्या भाषणाची सुरुवात केली. जय भवानी जय शिवराय, खरं सांगू तर मला आता खूप नर्व्हस वाटतं. मी मराठीत बोलू शकतो. दहावीपर्यंत मराठी शाळेत शिकलो. दहावीत मराठीत जास्त मार्क होते, हिंदीत कमी होते. पण इतकी चांगली नाही. त्यामुळे चुकीला माफी असावी. जावेद सरांनंतर इथे येणं आणि मराठीत कविता म्हणणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात नर्व्हस क्षण आहे. नॉन महाराष्ट्रीयन असूनही ज्याचे संगोपन महाराष्ट्रात झाले, ज्याचे शिक्षण महाराष्ट्रात झाले, जो काम महाराष्ट्रात करतो आणि आज तो या मंचावर असणं मराठी भाषा दिनाच्या दिवशी शिवाजी पार्कात असणं ही खरंच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. राज ठाकरे तुम्ही मला हा मान दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, असे विकी कौशल म्हणाला.