प्रस्तावित वीजदरवाढीविरोधात आंदोलनाची तयारी
वीजदरवाढीविरोधात सर्वसामान्य नागरिकांबरोबर उद्योजकही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा

सातपूर : प्रस्तावित वीजदरवाढीचा प्रत्येक ग्राहकाने विरोध करावा, असे आवाहन औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले. या वेळी आयोगाने सुनावणीदरम्यान ग्राहकांचे पूर्ण ऐकून घ्यावे, अशी मागणी करत वीजदरवाढीविरोधात सर्वसामान्य नागरिकांबरोबर उद्योजकही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ‘आयमा’चे अध्यक्ष ललित बूब यांनी दिला.
वीजदरवाढीचा विरोध करण्यासाठी संघटनांची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद झाली. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष ललित बूब सरचिटणीस प्रमोद वाघ,उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, आयमा बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, निमाचे राजेंद्र अहिरे, मिलिंद राजपूत, महाराष्ट्र चेंबरचे संजय सोनवणे, आयमाचे माजी अध्यक्ष निखिल पांचाळ आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात सर्व औद्योगिक संघटनांनी वीज दरवाढीच्या विरोधात एकत्रित काम करण्याचे व वीज दरवाढ रद्द करण्याचे सूचित केले. ललित बूब यांनी वीज दरवाढीच्या विरोधात औद्योगिक संघटनांकडून आंदोलन करण्याबरोबर पिटिशन दाखल करू, असेही ललित बूब यांनी सांगितले.
हेही वाचा : मराठी भाषा गौरव दिन: चला, जपूया आपली मायमराठी!
संजय सोनावणे यांनी सर्व गोष्टी मोट्या प्रमाणात उपलब्ध असूनही नुसते वीज दरवाढीमुळे महाराष्ट्राची प्रगती होत नसल्याचे त्यांनी उल्लेख केला. वीज दरवाढीच्या भावना आमदार खासदार, उद्योगमंत्री, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पत्राद्वारे व भेटीद्वारे कळविल्या जातील, असे राजेंद्र अहिरे म्हणाले. आयमाचे माजी अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी गुजरात राज्यात विजेवर फक्त दीड टक्के उद्योग अवलंबून आहेत बाकी सर्व उद्योगात स्वतंत्र यंत्रणा आहे. तसा वापर करावा असे सूचित केले. राजेंद्र पानसरे म्हणाले, फक्त वीज दरवाढ पाहिजे, सुधारणा नको असतात.
ज्ञानेश्वर गोपाळे, रवींद्र झोपे यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद राजपूत म्हणाले, की शासन विरोधात असते तेव्हा उद्योजकांबरोबर असते व सत्तेत आल्यावर उद्योजकांसोबत दिलेले आश्वासने पाळत नाही. यासाठी औद्योगिक संघटनांनी कठोर भूमिका घ्यावी. औद्योगिक संघटनांनी लढा दिल्यावर मराठवाडा व विदर्भाला वीजदरात सूट दिल्याची आठवण करून दिली. विनीत पोळ म्हणाले, विजेचा दर देशासाठी एकच असावा. कुंदन डरंगे यांनी यासाठी एकसंध होऊन एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले. आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी आभार मानले. या वेळी उदय येवले, अजय यादव, दिलीप वाघ, जगदीश पाटील, राजेंद्र कोठावदे आदींसह उद्योजक उपस्थित होते.