‘सुलतान’ लघुपटाला फ्रान्स मधील टुलूज फिल्म फेस्टिव्हलमध्ये दुहेरी नामांकन

पुणे | मराठी लघुपट सुलतान ने आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. सुलतान ची अधिकृत निवड टुलूज इंडियन फिल्म फेस्टिव्हल, फ्रान्स 2025 साठी झाली असून, या लघुपटाला ‘ज्यूरी ॲवार्ड’ व ‘ऑडियन्स चॉईस ॲवार्ड’ या दोन्ही प्रमुख पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे. हा प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल फ्रान्समधील टुलूज (Toulouse) शहरात २३ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान पार पडणार आहे. यावर्षी या महोत्सवाचे १०वे वर्ष साजरे केले जात आहे.
सुलतान या लघुपटाने भारतातील अनेक शॉर्टफिल्म्सना मागे टाकत आपले स्थान निश्चित केले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कथेवर आधारित असलेला सुलतान हा लघुपट दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांनी दिग्दर्शित केला असून, त्यांनीच या कथेचे रुपांतर सिनेमात केले आहे. लघुपट सामाजिक वास्तवाचे ठसठशीत चित्रण करते आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत अण्णा भाऊ साठेंचा संदेश पोहोचवते.
हेही वाचा : ‘छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं’; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
सुलतान याआधीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली उपस्थिती नोंदवून, मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. यापूर्वी सुलतान ची वर्ल्ड प्रीमियर जर्मनीतील २१व्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल, स्टुटगार्ट मध्ये झाली होती. या महोत्सवात सुलतान ला ‘German Star of India’ पुरस्कारासाठी नामांकन लाभले होते. विशेष म्हणजे, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित कोणत्याही कलाकृतीने प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवले होते.
याशिवाय सुलतान चा आशिया प्रीमियर जागरण फिल्म फेस्टिव्हल मध्ये झाला होता. तसेच इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्न ३६५ या प्रतिष्ठित महोत्सवातही ‘सुलतान’ची निवड झाली होती. देशांतर्गत महोत्सवांमध्येही या लघुपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून राजश्री लोकराजा छत्रपती शाहू महाराज लघुपट महोत्सव येथे ‘सुलतान’ ला प्रेक्षकांचा विशेष गौरव मिळाला होता.
सामाजिक आशय, अभिनय व तांत्रिक बाजू या सर्वच अंगांनी या लघुपटाने समीक्षकांची व प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. सध्या सुलतान च्या टुलूजमधील यशाने मराठी चित्रपटसृष्टीत नवचैतन्य निर्माण झाले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवणाऱ्या मराठी लघुपटांची संख्या वाढविणाऱ्या या लघुपटाचे हे यश निश्चितच गौरवास्पद आहे.