#CoronaVirus: धुळ्यात एका दिवसात कोरोनाचे १८ रूग्ण

शुक्रवारी रात्री एकाच वेळेला करोनाचे १८ रुग्ण आढळून आल्याने धुळ्यात खळबळ उडाली आहे. यातील सात जण एसआरपी जवान आहेत. देवपुरातील बाधित डॉक्टराच्या संपर्कातील चौघांना करोनाची लागण झाली आहे. धुळ्यातील रुग्णांची संख्या ५२ झाली असून यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता मिळालेल्या १८ अहवालांमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे सात जवान बाधित असल्याचे उघड झाले. हे जवान शहरात ऐंशीफूटी रोड, तिरंगा चौक तसेच दाट लोकवस्तीच्या भागात बंदोबस्ताला होते. दोन दिवसापूर्वी देवपुरातील महम्मदी नगर परिसरातील एका डॉक्टरला करोनाची बाधा झाली. या डॉक्टरच्या संपर्कातील काही लोकांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात चौघे करोनाबाधित आढळले आहेत. याआधी करोनावर उपचार करणाऱ्या श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रूग्णालयातील एका शिकाऊ डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. यानंतर आणखी एका डॉक्टरला करोनाची लागण झाली आहे.
तालुक्यातील मोहाडी, नगांवबारी, सुकवड गावातील रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. तसेच अमळनेर येथील एका व्यक्तीलाही करोनाची लागण झाल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ५२ झाली आहे.





