‘छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं’; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी व शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या. तर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याच कार्यक्रमात उदयनराजे यांच्या मागण्या मान्य केल्या.
उदयनराजे त्यांच्या भाषणात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांसह आपल्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करायला हवी. उदयनराजेंच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिलं.
हेही वाचा : संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा; ‘खाटकाच्या लाकडावर बकरा’ पोस्टमागील अर्थ उलगडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ज्या मागण्या केल्या, त्यासंदर्भात आमचं (सरकारचं) त्यांच्याशी बोलणं झालं आहे. यावर आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर आपण योग्य ती कारवाई करणार आहोत. यासह आमचं सर्वांचंच असं मत आहे की आपल्या महापुरुषांचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे. परंतु, आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर लोकशाही अनुरूप कारवाई होईल. लोकशाही अनुरूप कठोर नियम करण्याचं आम्ही निश्चित केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीने तयार केला पाहिजे अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे. आम्हालाही ती मागणी योग्य वाटते. राज्य सरकारच्या वतीने असा प्रमाण इतिहास तयार केला पाहिजे. आम्ही निश्चितपणे हे कामही लवकरच हाती घेऊ, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.