breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश…. निवडणुका विकासाच्या मुद्यावर व्हाव्या !

पुणे । प्रतिनिधी
देशात-राज्यातील निवडणुका जाती-पातीच्या किंवा धर्माच्या नावाने नव्हे, तर विकासाच्या मुद्यांवर लढवल्या पाहिजते, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकासाच्या मुद्यांवर निवडणुका लढवणार, असे स्पष्ट झाले आहे.
अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा केली जात आहे, अशी खंत व्यक्त करीत मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्याचा मुद्दा भाजपने उठवला असून यावर मुंबईत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले.
पवार म्हणाले की, कुणी कुठला मुद्दा घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार कुठलंही असो सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जे सांगेल त्याची अंमलबजावणी सरकारला करावी लागते आणि मुद्दा पटला नाही तर अपीलही करावे लागते. कोर्टाने काय निर्णय दिला आहे तो वाचला नाही मात्र त्याची माहिती घेऊन कोर्टाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने लक्षणीय यश मिळवले. पंजाबमध्ये आपची बहुमताने सत्ता आली. तसेच, गोवा आणि अन्य राज्यांत मिळालेला मतदानाचा टक्काही वाढलेला आहे. अवघ्या ९ वर्षांत आपने देशातील दोन राज्यांत सत्ता स्थापन केली. दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार किंवा जाती-धर्मांच्या मुद्यांवर निवडणूक न लढवता विकासाच्या मुद्यांवर लोकांची मते मागीतली. त्याला मतदारांनी साथ दिली. त्यामुळे आपच्या धर्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेही विकासाच्या मुद्यांवर निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजकीय नेत्यांनी आत्मचिंतन करावे : अजित पवार
राज्यात जातीय सलोखा राहण्याच्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न केला पाहिजे. पक्षाच्या नेत्यांनीही तीच भूमिका मांडण्याचं काम केलं पाहिजे. यंदाच्या १५ अॉगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज ७५ वर्ष पूर्ण होत असताना जग कुठला विचार करतंय आणि आपण कुठल्या विषयांमध्ये जनतेला गुंतवून ठेवतोय आणि कुठल्या विषयाला महत्त्व देतोय याचं आत्मपरीक्षण… आत्मचिंतन झालं पाहिजे, असे सांगतानाच जनतेनेही या विषयाचा फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button