breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘सामना’च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका!

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले, अशी खोचक टीका सामनातून देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

‘सामना’च्या अग्रलेखानत नेमकं काय म्हटलं?

देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा!

झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेऊन पडलेल्यांना जागे कसे करायचे, हा प्रश्न नेहमीच असतो. महाराष्ट्रात सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत. एक आपले मुख्यमंत्री, ते सहसा झोपत नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस, ते सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. ”मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच,” असे श्री. फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! पुण्यातून सुटणाऱ्या १२ रेल्वे गाड्या रविवारी रद्द

गेल्या वर्षभरात त्यांचे हे ‘पुनः पुन्हा’ प्रकरण इतक्या वेळा झाले आहे की, जनतेच्या शब्दकोशातून ‘पुन्हा’ हा शब्द बाद होण्याची शक्यता आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले. आज हे ‘उप’ एका अननुभवी, बेइमान, भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करीत आहेत. मी येणारच होतो, पण काही लोकांनी बेइमानी केली म्हणून मध्येच लटकलो, पण तरीही आलो. या त्यांच्या बोलण्यात इमानदारीचा जोश नाही. आता २०१९ साली बेइमानी कोणी केली, हे महाराष्ट्र जाणतो. फडणवीस व त्यांचा पक्ष अर्धग्लानीत असला तरी महाराष्ट्राची जनता झोपेत नाही.

बेइमानी केली ती भाजपच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी. सत्तेचे वाटप समसमान करण्याचा शब्द देऊन तो फिरवण्यात आला व श्री. फडणवीस हे त्याचे साक्षीदार आहेत. ही बेइमानी तेव्हा झाली नसती तर महाराष्ट्रात फडणवीस सन्मानाने पुनः पुन्हा आलेच असते आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता हे सत्य ‘प्यारे’ फडणवीस नाकारू शकत नाहीत. २०१९ च्या बेइमानीमुळेच शिवसेना-भाजपची युती तुटली. २०१४ सालात या भाजपने रोवली याचा खुलासा श्री. एकनाथ खडसे यांनी केलाच आहे. त्यामुळे ज्या काही बेइमान लोकांमुळे फडणवीस २०१९ ला येऊ शकले नाहीत ते सर्व बेइमान त्यांच्याच घरात आहेत.

श्री. फडणवीस म्हणतात, ”पहा, मी पुन्हा आलो.” हे सत्य नाही. ते अजिबात आलेले नाहीत, तर दिल्लीने त्यांचे राजकीय श्राद्ध घालण्याचा प्रयोग केला. फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी, कर्तबगार नेत्याला ‘बिनपगारी उपअधिकारी’ करून टाकले. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वच बाबतीत व क्षेत्रांत चिंतेची स्थिती निर्माण झाली.

भ्रष्टाचाराचे, महिलांवरील अत्याचाराचे आरोप असलेले लोक फडणवीस यांचे मंत्रिमंडळातील सोबती आहेत व या महान ‘उप’ महोदयांना गटारगंगेस अत्तराची नदी म्हणावे लागत आहे. हे असे पुन्हा पुन्हा येणे दुश्मनाच्या नशिबीही नसावे. महाराष्ट्राची लूट सुरू आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश विधानसभा अध्यक्ष पाळायला तयार नाहीत, पोलिसांचा वापर गुंडांच्या रक्षणासाठी सुरू आहे, जागोजागी लोकांचे बळी जात आहेत. पुन्हा पुन्हा ‘उप उप उप’ म्हणून आलेल्यांच्या नजरेसमोर हे घडत आहे. देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button