breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

अ. भा. मराठा महासंघासह विविध संघटनांचा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

मराठा महासंघ, खान्देश तिळवण तेली समाज मंडळाचा बारणे यांना साथ

पिंपरी: अखिल भारतीय मराठा महासंघ, खान्देश तिळवण तली समाज मंडळ, माजी सैनिक संस्था अशा विविध संस्था संघटनांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने खासदार बारणे यांना पाठिंब्याचे लेखी पत्र देण्यात आले. पत्रावर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष संतोष भांगरे, सरचिटणीस संजय देसाई यांच्या सह्या आहेत.

मराठा महासंघाने पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, सरकारच्या विविध खात्यांमध्ये निवड झालेले 2,200 तरुणांना आरक्षण रद्द झाल्यामुळे नियुक्तीपासून वंचित रहावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यात बसून या मराठा तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. मंत्रालयात राजमाता जिजाऊ मा साहेबांचे तैलचित्र बसवण्यात आले.

2016 मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला शिक्षणात 13 टक्के तर नोकरीत 12 टक्के आरक्षण दिले. मराठा तरुण तरुणींना नवसंजीवनी ठरणारी सारथी संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून अनेक तरुणांना शासकीय सेवेत संधी मिळाली. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या 86,220 तरुण मराठा व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनामुळे महायुती सरकारने न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन करून सर्व सरकारी खात्यांना कुणबी नोंदी शोधण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या असून शोध मोहीम पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. नोंदी सापडलेल्या सर्वांना त्वरित कुणबी दाखले देण्याचे आदेश सरकारने दिले आहे, त्याबद्दल पत्रात समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाने 25 जुलै 2023 रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे लाक्षणिक उपोषण केले होते. आरक्षणाची मर्यादा वाढवून महाराष्ट्रातील मराठा व भारतातील क्षत्रिय समाजांना संवैधानिक आरक्षण द्यावे, ही मागणी महायुतीने मान्य करून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे, असे पत्रात म्हटले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाने केले आहे.

खान्देश तिळवण तेली समाजाचा पाठिंबा

पिंपरी-चिंचवड व पुणे परिसर खान्देश तिळवण तेली समाज मंडळाने खासदार बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मावळ मतदार संघात या समाजाचे सुमारे पाच हजार मतदार आहेत. मंडळाचे अध्यक्ष अनिल चौधरी व सचिव भरत चौधरी यांनी बारणे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. खासदार बारणे हे खान्देश तिळवण तेली समाजाच्या अडीअडचणीच्या वेळी सदैव पाठीशी उभे राहतात व समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ती मदत तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतात. त्यामुळे समाज बांधवांच्या संमतीने खासदार बारणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मंडळाच्या कार्यकारणीने एकमताने घेतला आहे, असे पत्रात म्हटले आहे.

देहूगाव माजी सैनिक संस्थेचा पाठिंबा

श्रीक्षेत्र देहूगाव येथील माजी सैनिक संस्थेने खासदार बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल सवालाखे यांनी बारणे यांना पाठिंबा पत्र दिले. सुमारे 160 नोंदणीकृत माजी सैनिकांची कुटुंबे या संस्थेची सभासद आहेत. आम्ही संस्थेसाठी देहूगाव विठ्ठलवाडी येथे सर्वे नंबर 97 मधील सरकारी जमिनीची मागणी केली असता कोणताही विलंब न लावता खासदार बारणे यांनी न हरकत प्रमाणपत्र देऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात व मंत्रालयात पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन केले. खासदार बारणे यांचे संसदेतील कार्यही उल्लेखनीय आहे. सर्वांना जिवाभावाचा वाटणारा, जमिनीवरील लोकनेता भविष्यातही हवा असल्यामुळे माजी सैनिकांच्या परिवारांनी बारणे यांना पाठिंबा दिला आहे, असे पत्रात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button