breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

खासदार बारणे बोलले… पण, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी धारिष्ठ्य दाखवले नाही!

मावळ लोकसभा मतदार संघासाठी शहर राष्ट्रवादी निद्रावस्थेत
पार्थ पवारांचे समर्थन करण्याऐवजी पदाधिकाऱ्यांची ‘‘चुप्पी’’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन शिव संवाद दौऱ्यांत चौफेर टीका केली. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बारणेंच्या टीकेला उत्तर देण्याचे धारिष्ठ्य दाखवले नाही. त्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीसाठी शहर राष्ट्रवादी निद्रितावस्थेत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून युवा नेते पार्थ पवार यांना मैदानात उतरवण्यात आले. शिवसेना- भाजपा युतीचा फायदा खासदार श्रीरंग बारणे यांना झाला. ७ लाख २० हजार ६६३ मते बारणेंना मिळाली. तब्बल ५ लाख ४ हजार ७५० मते मिळालेल्या पार्थ पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. मावळ मतदार संघाचे दोन भाग होतात. घाटा खालील तीन विधानसभा मतदार संघ जसे की कर्जत, पनवेल आणि उरण तसेच घाटावरील मावळ, चिंचवड आणि पिंपरी असे सहा विधानसभा मतदार संघ असलेल्या मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजपाची ताकद मोठी आहे. २००९ स्वर्गीय गजानन बाबर, २०१४ व २०१९ असे सलग दोनदा श्रीरंग बारणे असे सलग तीनदा शिवसेनेचे वर्चस्व राहीले आहे. घाटाखाली शेकाप पक्षाची ताकदही चांगली आहे.
राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रमुख पक्ष आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा महाविकास आघाडी एकत्रितीतपणे लढणार आहे, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वारंवार जाहीरपणे स्पष्ट केले आहे. श्रीरंग बारणे यांना दोनदा तिकीट मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडावा. तसेच, राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांना संधी द्यावी आणि संसदेत पाठवावे, असे आवाहन करणारे पत्र राष्ट्रवादीच्या मावळातील एका पदाधिकाऱ्यांने दिले. त्यावरुन राज्यपातळीवर या विषयाची चर्चा सुरू झाली.
खासदार बारणे यांनी केलेल्या टीकेमुळे मावळातील महाविकास आघाडीत सर्व अलबेल नाही, असे सिद्ध झाले. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कामे करीत नाही. शिवसेनेला दुजाभाव दिला जातो, असा थेट आरोप केला. मावळातील उमेदवारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वत: निवेदन देणार असल्याचेही जाहीरपणे सांगितले. उमेदवारी क्षमता आणि दर्जाच्या पार्श्वभूमीवर दिली जाते, असा टोलाही हाणला. पण, यावर स्थानिक राष्ट्रवादीच्या एकाही पदाधिकाऱ्याने तोंड उघडले नाही.
राष्ट्रवादीने गेल्या २० वर्षांत अनेकांना महापौर, नगरसेवक, स्थायी समिती सभापती, आमदार बनवले. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत शिवसेनेच्या खासदारांनी केलेल्या आरोपांना सनदशीर उत्तर देण्याचे धाडस कुणीही दाखवले नाही. शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे काहीही बोलले नाहीत. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षा होती. राष्ट्रवादीने नुकताच पक्ष संघटनेत बदल केला. शहराध्यक्षपदी २० वर्षे सभागृहात काम करण्याचा अनुभव असलेले आणि आक्रमक चेहरा असलेले अजित गव्हाणे मूग गिळून गप्प बसले. ३० वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृह गाजवणारे आणि महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारुढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषवलेले अभ्यासू योगेश बहल हेसुद्धा चिडीचूप राहिले. खासदार बारणे आपल्या नेत्यांवर तोंडसुख घेत आहेत आणि ही मंडळी उघड्या डोळ्यांची मजा पाहत आहेत, अशी स्थिती आहे.
राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बारणेंविरोधात का बोलत नाहीत?
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे पहिले प्राधान्य महापालिका निवडणूक आहे. स्थानिक नेत्यांना लोकसभा निवडणुकीत रस नाही. आपली वर्णी सभागृहात कशी लागेल? त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मदत कशी होईल, यातच स्वारस्य आहे. तसेच, स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत मिलिभगत आहे. अनेकांची व्यावसायिक भागिदारी आहे. त्यामुळे बारणेंच्या विरोधात बोलून गावकी-भावकी अंगावर घेण्यासाठी कुणालाही बळीचा बकरा व्हायचे नाही.
संघटनात्मक बदल करुन काय साध्य केले?
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहर संघटनेत बदल केला. शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे, महिलाध्यक्ष पदी कविता आल्हाट, युवकाध्यक्षपदी इम्रान शेख यासह कार्याध्यक्षपदी राहुल भोसले, प्रशांत शितोळे आणि राजू बनसोडे यांची निवड करण्यात आली. आक्रमक आणि अभ्यासू संघटनात्मक चेहरा अजित गव्हाणे मिळाले, असा दावाही अनेकांनी केला. मात्र, गव्हाणे यांनी बारणेंच्या टिकेला साधे प्रत्त्युत्तरही दिले नाही. यापूर्वी, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, सुलक्षणा शिलवंत यांच्यासारखे नेते राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्यांशी दोन हात करीत होते. मात्र, ‘टीम गव्हाणे’अजित पवार, पार्थ पवार यांच्यासह राष्ट्रवादीवर खुलेआम टीका करणाऱ्या बारणेंविरोधात चकार शब्द काढत नाहीत. मग, संघटनात्मक बदल करुन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय साध्य केले? असा सवाल निष्ठावंतांमधून उपस्थित केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button