मांडवा – माझगाव ते रत्नागिरी – मालवण सागरी मार्गावर गणेशोत्सवापुर्वी रो रो सेवा सुरु होणार

रत्नागिरी : राज्यातील रस्ते आणि रेल्वे मार्गासोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी आणि मालवण सागरी मार्गाद्वारे रो रो सेवा सुरु करण्यात येणार आहे, या निमित्ताने नवा अध्याय राज्यात सुरु होईल, असे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांबरोबर बोलताना सांगितले.
रत्नागिरीच्या दौ-यावर असताना ते म्हणाले, राज्यात दळणवळण व्यवस्था भक्कम करण्यासाठी रस्ते आणि रेल्वे बरोबर जलवाहतूक वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माजगाव येथून रो रो जलसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. या रो रो जलसेवेमुळे रत्नागिरीपर्यंत तीन तासात तर मालवण, विजयदुर्गपर्यंत साडेचार ते पाच तासात पोहोचता येणार आहे.
हेही वाचा – राज्यभरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात! मुंबई, पिंपरी-चिंचवडसह इतर ठिकाणीही संसर्गात मोठी वाढ
या रो रो जलसेवेमध्ये जवळपास १०० गाड्या आणि ५०० प्रवासी घेऊन माजगाव येथून सोडणे शक्य होणार आहे. यासाठी लागणारी बोट किंवा क्रूज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आली आहे. गणेश चतुर्थीच्यापूर्वी हि सेवा सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे नितेश राणे यावेळी पत्रकारांना सांगितले.