वेळेआधीच आलेल्या ‘मान्सून’चा वेग मंदावला, ‘या’ तारखेपासून पुन्हा सक्रिय होणार

Monsoon Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, १६ वर्षांनंतर पहिल्यांदाच वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनची पुढील वाटचाल सध्या मंदावली आहे. यामुळे भारतात एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, ११ जूनपासून मान्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – मांडवा – माझगाव ते रत्नागिरी – मालवण सागरी मार्गावर गणेशोत्सवापुर्वी रो रो सेवा सुरु होणार
मान्सूनच्या वाटचालीचा मागोवा घेणाऱ्या हवामान विभागाच्या चार्टनुसार, केरळमध्ये २४ मे रोजी मान्सून दाखल झाला. त्याने नेहमीच्या वेळेपूर्वीच दक्षिण, ईशान्य आणि पश्चिम भारतातील काही भाग व्यापला. पण गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रगती थांबल्याचे दिसून थांबली असल्याचे दिसून आले आहे.
११ जून दरम्यान, बंगालच्या उपसागरात एक हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे; जी मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक ठरेल. यामुळे उत्तर भारतातील त्याच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करेल, असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.