breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

मिशन-२०२२ : ‘सेनापती’चा वाढदिवस अन्‌ पिंपरी-चिंचवडमधील ‘मरगळलेले मावळे’!

  • पिंपरी-चिंचवड शहरात वातावरण निर्मिती करण्यास मातब्बरांना अपयश

  • संजोग वाघेरे-पाटील अन्‌ टीमची अवस्था ‘बाजीप्रभू देशपांडे’सारखी

 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘सेनापती’ आणि देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस महाराष्ट्रभरात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील मावळे आपली मरगळ झटकायला तयार नाहीत. त्यामुळे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि टीमची अवस्था पावन खिंडीत एकाकी लढणाऱ्या ‘बाजीप्रभू देशपांडे’यांच्यासारखी झाली आहे. याबाबत आता स्थानिक दिग्गजांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

मुंबईतील नेहरु तारांगण येथील दिमाखदार सोहळ्यात आणि संपूर्ण राज्यातील राष्ट्रवादीच्या ‘शिलेदारांच्या’ साक्षीने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आणि राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक शहरात करण्यात आले. युवकांपासून वृद्धांपर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रमांद्वारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याप्रति आदरभाव व्यक्त केला.

मुंबईतील कार्यक्रमात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रभावी संवाद केला. हिमालयासारखा खंबीर सेनापती आपल्या पक्षाला लाभला आहे. सेनापती हा मार्गदर्शक आणि दिशा दाखवणारा असतो. पण, खरी लढाई ही आपण मावळ्यांना करायची आहे, असे अत्यंत अर्थपूर्ण भाष्य केले. पवार यांचे वय आता ८१ झाले आहे. त्यांचे मार्गदर्शन आणि दाखलेली दिशा आपल्याला निश्चितपणाने यशापर्यंत घेवून जाणारी आहे. पण, त्यासाठी आपण लढाई केली पाहिजे. संघर्ष उभा केला पाहिजे, ही त्यामागील भावना होती. डॉ. कोल्हेंचे हे भाष्य पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेत्यांना तंतोतंत लागू होते.

शरद पवार यांचा संपूर्ण राज्यात सामाजिक उपक्रम आणि विविध कार्यक्रमांनी दिमाखात वाढदिवस साजरा होत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र चित्र उदासीन दिसले.

शहरातील भोसरी, चिंचवड आणि पिंपरी अशा तिनही विधानसभा मतदार संघामध्ये मुंबईतील कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. भोसरीत कै. अंकुशराव लांडगे सभागृहात, पिंपरीतील आचार्य अत्रे नाट्यगृह आणि चिंचवडमध्ये कापसे लॉन्स येथे नियोजन करण्यात आले. भोसरीची जबाबदारी नगरसेवक अजित गव्हाणे आणि पदाधिकारी यांच्याकडे, चिंचवडची जबाबदारी नगरसेवक नाना काटे आणि पदाधिकारी, तर पिंपरीची जबाबदारी नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळली.

भोसरी , चिंचवड फसले… पिंपरी जिंकले.. !
भोसरी मतदार संघात सध्यस्थितीला एकूण १२ प्रभाग आणि ४८ नगरसेवक आहेत. प्रत्येक प्रभागातून चार इच्छुक  आणि सर्व सेलचे पदाधिकारी असे किमान ५०० हून अधिक श्रोते उपस्थित रहायला हवे होते. तेच चिंचवड मतदार १३ प्रभागातील ५२ नगरसेवक आहेत. प्रत्येक ठिकाणी चार इच्छुक गृहित धरले आणि सर्व पदाधिकारी असे किमान ७०० श्रोते अपेक्षीत होते. दुसरीकडे पिंपरी मतदार संघामध्ये एकूण सात प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून चार इच्छुक आणि विध्यमान पदाधिकारी व कार्यकर्ते असे गृहित धरल्यास आणि राखीव मतदार संघ लक्षात घेता ३०० श्रोते अपेक्षीत होते. भोसरी आणि चिंचवडमध्ये नियोजन फसले. पिंपरी मतदार संघात श्रोत्यांची उपस्थिती चांगली दिसत होती. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, पिंपरी मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासह नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांनी एकीचे बळ दाखवत कार्यक्रम यशसवी केला. भोसरी आणि चिंचवडमध्ये ऐकीत बेकी  दिसल्याने कार्यक्रम फसला, असे चित्र आहे. वास्तविक, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या नव्या ‘युती’मुळे भोसरीतील माजी आमदार पक्षाच्या कार्यक्रमांपासून अलिप्त आहेत. लांडे सक्रीय असते, तर भोसरीसह चिंचवडमधील कार्यक्रमही यशस्वी झाला असता, असे राजकीय जाणकार सांगतात.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला शक्य मग राष्ट्रवादीला का नाही?

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महिनाभर जाहिरातबाजी झाली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा प्रदेशा उपाध्यक्षा चित्रा वाघ, विधान परिषद आमदार गोपिचंद पडळकर यांनी पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमांना हजेरी लावून जोरदार वातावरण निर्मिती केली. मात्र, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोन-तीन छोटेखानी कार्यक्रम वगळता राष्ट्रवादीच्या ३४ मातब्बर नगरसेवक आणि शेकडो पदाधिकाऱ्यांना एकही बाज सामाजिक उपक्रम, कार्यक्रम हाती घेता आला नाही. याउलट, नगरसेवक किंवा कोणत्याही पदावर नसताना उद्योजक अभय मांढरे यांनी शहरात सूचक संदेश देणारे फलक लावून पिंपरी-चिंचवडकरांच्या मनाला साद घातली. ‘‘घार उडाली आकाशी… नजर तिची पिलापाशी’’ अशा फलकांनी पिंपरी-चिंचवडकरांची मने जिंकली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी प्रसारमाध्यमांमध्ये शुभेच्छा जाहिराती दिल्या. तर, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे आणि अजित गव्हाणे यांनी चार-दोन फ्लेक्स लावण्याव्यतिरिक्त सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमाच्या बाबतीत उदासीनता दिसली. पुणे जिल्ह्यात शरदचंद्र स्वाभीमान सप्ताह, शरद पवार गुणवंत कन्यारत्न पुरस्कार, शरद व्याख्यानमाला, पावसातला सह्याद्री शरद पवार गुगल ॲप, संपूर्ण जिल्ह्यात १ लाख कोविड लसीकरण मोहीम आदी विविध समाजिक, सांस्कृतिक लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र लक्षवेधी ठरेल असा एकही उपक्रम पहायला मिळाला नाही. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा वातावरण निर्मिती करु शकते, मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का नाही? याचे आत्मचिंतन स्थानिक ज्येष्ठ, मातब्बर, दिग्गज नेत्यांनी करायला हवे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button