To The Point: स्थानिकांचा विश्वास राष्ट्रवादी आता तरी कमावणार की गमावणार?
स्वीकृत सदस्य निवडीची ‘चॉईस फेल’ : आता विधान परिषदेवर तरी संधी मिळेल काय?
पिंपरी-चिंचवड । अधिकराव दिवे-पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून (१९९९) ते २०१७ पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसावे लागले. २०१४ च्या निवडणुकीत शहरातून राष्ट्रवादी हद्दपार झाली. एकही आमदार निवडून आला नाही. २०१७ मध्ये महापालिकेतील सत्ता गेली. २०१९ मध्ये चिंचवड आणि भोसरी मतदार संघात अधिकृत उमेदवार देता आला नाही. त्यानंतर २०२६ मध्ये अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक करुनसुद्धा विरोधातच बसावे लागले. याचे कारण, काय? असा विचार राष्ट्रवादीचे नवे ‘कारभारी’ अर्थात खासदार पार्थ पवार आणि सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार आहेत का? असा प्रश्न आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणाला गावकी-भावकी आणि नाती-गोत्यांची झालर आहे. किंबहुना, त्याशिवाय इथला राजकीय परीघ पूर्ण होत नाही. भविष्यातील किमान ३० वर्षे स्थानिक गाववाले शहराच्या राजकारणावर सत्ता गाजवतील. कारण, बाहेरचा व्यक्ती उद्योग-व्यावसायामध्ये स्थीरस्थावर होईपर्यंत भूमिपुत्र शेकडो कोटी रुपयांचे मालक झालेले असतात. भूमिपुत्र आता शिक्षणाने, आर्थिक सुबत्तेने आणि राजकारणातील मुत्सद्देगिरीत तरबेज झालेले आहेत. त्यामुळे शहराच्या राजकारणात ‘उपऱ्या’ लोकांना फार मोठी ‘स्पेस‘ मिळेल अशी सूतराम शक्यता नाही. पूर्वी दिवंगत आण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे, गजानन बाबर अशा मातब्बरांनी ती ‘स्पेस’ मिळवली होती. पण, आता भूमिपुत्रांचा आत्मविश्वास आणि साम-दाम-दंड-भेदची ताकद प्रचंड वाढलेली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराला विकासाचे ‘रोल मॉडेल’ बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ते यशस्वीसुद्धा झाले. पण, स्थानिक आणि बाहेरचा हा वाद दादा शेवटपर्यंत संवेदनशीलपणे हाताळू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शहर राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्याला भारतीय जनता जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी हेरले आणि पहिला बडा नेता गळाला लावला. दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीविरोधात पहिले मोठे बंड केले. त्यानंतर आमदार महेश लांडगे त्यांच्या सोबतीला आले. २०१७ मध्ये राष्ट्रवादीचा सुपडा साप झाला. ‘‘नकाे बारामती, नको भानामती; पिंपरी-चिंचवडची धुरा देवू राम-लक्ष्मणाच्या हाती..!’’ ही निवडणूक प्रचार घोषणा त्यावेळी प्रचंड गाजली.
२०१९ मध्ये दिवंगत अजितदादांनी मोठ्या अपेक्षेने पार्थ पवार यांना मावळातून लोकसभेवर पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना खासदार श्रींरग बारणे यांनी ‘‘राजपूत्र हवा की भूमिपूत्र?’’ अशी साद इथल्या भूमिपुत्रांनी घातली आणि अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार पराभूत झाले. त्यानंतर पार्थ यांना राजकारणात सूर गवसला नाही. शेवटी त्यांना राज्यसभेवर जावे लागले, हे उघड सत्य आहे.
हेही वाचा : डिलिमीटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? सुप्रिया सुळेंचा सवाल
अजितदादांनी स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवला..
दरम्यान, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाचे आमदार महेश लांडगे असा सामना निर्माण झाला होता. २०१९ च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि दिवंगत अजितदादा यांना भाजपातील अस्वस्थ आणि अतृप्त मंडळींनी राजकीय स्वार्थ भावनेतून इथल्या काही मंडळींनी अक्षरश: ‘‘मिसगाईड’’ केले. संपूर्ण राज्यात दबदबा असलेल्या एव्हढ्या मोठ्या नेत्याला संबंधित ‘‘कथित चाणक्यांनी’’ शहराच्या गल्लीबोळात फिरवले. सभा घेण्यास भाग पाडले. २०२४ च्या निवडणुकीत गावकी-भावकीत वाद निर्माण केला आणि २०२६ च्या महापालिका निवडणुकीत अजितदादांना चौका-चौकात प्रचार सभा घ्यायला लावल्या. केवळ ‘हवा’ करुन निवडणूक जिंकता येते, यावर अजितदादांचा कधीच विश्वास नव्हता. पण, ‘मॅनेजमेंट’ चाणक्य… कथित रणनितीकार यांनी तसे चित्र निर्माण केले. अजितदादा त्या ‘पॉलिटिकल ट्रॅप’मध्ये फसले आणि अपक्षेप्रमाणे राष्ट्रवादी पुन्हा पराभूत झाली.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा कधीच ताकदवर नव्हती. केवळ अजितदादांनी स्थानिक भूमिपुत्रांवर अविश्वास केला आणि बाहेरच्या स्वार्थी आणि आत्मकेंद्री कथित चाणक्यांवर विश्वास ठेवला. त्यामुळे एकेकाळी मातब्बर असलेले भूमिपुत्र आज राजकीय प्रवाहाबाहेर पडले आहेत. अजितदादांनी ज्यांना पदे दिली… संधी दिली. त्यांनी भाजपासोबत स्थानिक पातळीवर ‘सेटलमेंट’ केली. २०१९ मध्ये पिंपरीची जागासुद्धा गेली असती, पण अजितदादांनी ऐनवेळी विचार बदलला आणि शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकून राहीले. पुढे आण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्ष झाले ते अजितदादांसोबत कायम राहिले. याच बनसोडेंविरोधात झालेली रणनिती काय होती? हा इतिहास पार्थ पवार यांनी लक्षात घेतला पाहिजे. भ्रामक कल्पनांवर पार्थ पवारांनी विश्वास ठेवू नये, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.
अजित गव्हाणे यांना संधी मिळाली नाही..!
महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक नियुक्तीबाबत चर्चा सुरू झाली. दिवंगत अजितदादा असते, तर त्यांनी डोसळपणे निर्णय घेतले असते. पण, पार्थ पवार यांनी पक्षहित न लक्षात घेता भाजपाला शह देण्याची रणनिती राबवली. त्यामध्ये राष्ट्रवादी किंवा पार्थ पवार यांच्या हाती काहीही लागणार नाही. कारण, २०१९ पासून २०१६ पर्यंत ज्यांच्या सल्ल्याने राष्ट्रवादीने रणनिती आखली. २०२४ च्या निवडणुकीत त्याचे पानिपत झाले. जो ‘नॅरेटिव्ह गॅग’ तयार केली. त्यातून काहीही हासील झालेले नाही. ज्यांना लोकांमधून निवडून येता आले नाही, ते स्वीकृत सदस्य झाल्यास काय तीर मारणार आहेत? असा प्रश्न आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये महापालिका निवडणूक झाली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसची विरोधी पक्ष म्हणून असलेली ‘स्पेस’ अवघ्या ६ जागा असलेल्या शिवसेना शिंदे गटाने घेतली. विरोधी पक्षनेता असलेले भाऊसाहेब भोईर आपल्या अलंकारिक आणि नाटकीय शैलीत मश्गुल आहेत. स्वीकृत नियुक्तीवरुन ‘‘ज्यांना तिकीट दिले होते. त्यांना स्वीकृत संधी नको..’’ असा ठराव स्थानिक नेत्यांनी प्रदेशाकडे पाठवला. पण, त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. अजित गव्हाणेंसारखा अनुभवी आणि संयमी चेहरा होता. त्यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांना तगडे आव्हान दिले होते. त्यांनी महापालिका निवडणूक लढवली नाही, तर भोसरी विधानसभेत पक्षाचे काम केले. शतप्रति:शत भाजपाचा नारा त्यांनी उधळून लावला. त्यांना संधी देवून २०२९ ची तयारी करता आली असती, पण पार्थ पवार यांनी ज्यांना लोकांनी नाकारले त्यांना संधी दिली आणि ‘सेल्फ गोल’ करुन घेतला आहे.
विधान परिषद निवडणुकीत चूक सुधारण्याची संधी पण..!
महापालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली व्हावी. या करिता माजी आमदार विलास लांडे यांनी स्वत:चा राजकीय वारसदार माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांना तिकीट घेतले नाही. माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराविरोधात पुतण्या विराज लांडे यांना उभे केले आणि निवडूनसुद्धा आणले. अजित गव्हाणे यांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरता पक्षाचा प्रचार आणि रणनिती ठरवण्याची जबाबदारी दिली. स्वत: विलास लांडे विधान परिषद, लोकसभा लढवण्यासाठी तयारी करीत होते. दिवंगत अजितदादांनी त्यांना थांबवण्याचे आदेश दिले. २०१४ पासून विलास लांडे अजितदादा जे म्हणतील तसे राजकीय निर्णय घेत आहेत. आता त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली पाहिजे, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.
दुसरीकडे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी राष्ट्रवादीच्या पडत्या काळात एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतली. त्यांना पार्थ पवार संधी देतील का? हा सुद्धा प्रश्न आहे. माजी महापौर योगेश बहल यांनी ७ वेळा महापालिका निवडणूक लढवली. पक्षातील बहुतेक मातब्बर सोडून गेले. पण, ते पक्षासोबत राहीले. फझल शेख यांना संधी देत बहलांच्या निष्ठेला फळ मिळाले. पण, विधान परिषदेची त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल का? आणि झालीच तर स्थानिक भूमिपुत्रांना ते मान्य होणार नाही, हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. त्यांना अंतर्गत विरोधाचा स्फोट होईल. त्यामुळे राष्ट्रवादी आणि पार्थ पवार तसेच सुनेत्रा पवार स्थानिकांचा विश्वास कमावणार की पुन्हा गमावणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





