नागराज मंजुळे यांच्या हस्ते केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन; नम्रता संभेराव यांच्या उपस्थितीत होणार समारोप
५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान रंगणार युवक महोत्सव; १०७ संघांचा सहभाग, २८ कलाप्रकारांत होणार स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते सोमवारी (दि. ५) सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात होणार आहे. तर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. ७) सकाळी १०.३० वाजता महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. याबाबतची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संजय कवडे यांनी शनिवारी (दि. ३) पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हास्तरीय युवक महोत्सव १ ते १२ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातील प्रत्येक कलाप्रकारातील विजेते तीन संघ केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यामुळे विविध कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय फुलारी राहणार आहेत. यावेळी सिनेअभिनेता तथा विद्यापीठाचा माजी विद्यार्थी कैलास वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गौतम पाटील आणि डॉ. योगिता होके पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समारोप कार्यक्रमास अभिनेत्री नम्रता संभेराव यांच्यासह पार्श्वगायक रवींद्र खोमणे उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा – गगनचुंबी इमारत, प्रचंड पर्वत पाहून भीती वाटते? ‘मेगालोफोबिया’ असू शकतो!
शोभायात्रेने होणार महोत्सवाचा प्रारंभ
युवक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ वाजता शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या हस्ते शोभायात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून विद्यापीठाच्या नाट्यगृहापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
शोभायात्रेसाठी ‘रे पाण्या’, ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’, ‘संत गाडगेबाबा १५० वी जयंती’, ‘भारतीय ज्ञान परंपरा’ आणि ‘महाराष्ट्राची विचारधारा’ असे पाच विषय देण्यात आले आहेत.
२८ कलाप्रकारांत रंगणार स्पर्धा
केंद्रीय युवक महोत्सवात एकूण १०७ संघ सहभागी होणार असून संगीत, नृत्य, नाट्य, वाङ्मय आणि ललित कला अशा पाच प्रमुख गटांमध्ये २८ कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. संजय कवडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे आणि प्रसिद्धी समितीप्रमुख डॉ. संजय शिंदे उपस्थित होते.





