होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी, ओमानमध्ये उपचार सुरू

Indian Sailors Injured Hormuz Attack | होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना ओमानच्या किनारपट्टीजवळ ‘एमटी ऑन पीस’ (MT On Peace) या पनामाचा ध्वज असलेल्या व्यावसायिक जहाजावर मंगळवारी भीषण क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यात जहाजावरील १२ क्रू मेंबर्स जखमी झाले असून, त्यात ११ भारतीय खलाशांचा समावेश आहे, अशी अधिकृत माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या जहाजावर एकूण १९ कर्मचारी कार्यरत होते, त्यापैकी १७ जण भारतीय नागरिक आहेत.
हल्ल्यानंतर तातडीने ओमानच्या सागरी सुरक्षा दलाने बचावकार्य राबवले. सर्व जखमी भारतीय खलाशांना जहाजावरून सुरक्षित बाहेर काढून ओमानमधील खसाब येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने केलेल्या मदतीबद्दल ओमान प्रशासनाचे आभार मानले आहेत.
हेही वाचा
चाकणपाठोपाठ थेऊर येथेही ‘पीएमआरडीए’ उभारणार घनकचरा प्रकल्प; १४ गावांतील कचराकोंडी फुटणार!
व्यापारी जहाजांवरील वाढत्या हल्ल्यांवर भारताने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. “आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर, निष्पाप खलाशांवर आणि नागरी वाहतुकीवर सातत्याने होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. या भागातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी असे हल्ले तातडीने थांबले पाहिजेत. जागतिक व्यापार आणि समुद्री दळणवळण पूर्ववत होणे अत्यंत गरजेचे आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात ठामपणे म्हटले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाची धग आणि जागतिक संकट
इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे सावट आता होर्मुझच्या सामुद्रधुनीवर गडद झाले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात कुवेतचे ‘एमटी काझिमा ३’ आणि लायबेरियाचे ‘लिप्सी’ यांच्यासह किमान सात टँकर्सना लक्ष्य करण्यात आले आहे. यापूर्वी जुलै महिन्यातही अशाच एका हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला होता. जगातील एकूण तेल आणि द्रवीभूत नैसर्गिक वायूच्या (LNG) सुमारे २० टक्के (१/५) वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे या मार्गावरील सततच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जहाजांचा विमा आणि वाहतूक खर्च प्रचंड वाढला असून, जागतिक ऊर्जा सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.





