‘विद्या-सेतू’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आळंदी | येथील एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान व संगणकशास्त्र विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ‘विद्या-सेतू’ या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य संकलन मोहीम राबवून जिल्हा परिषद शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत चिंबळी व पाचवड केंदूर येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन तेथील एकूण २५ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, लेखन साहित्य तसेच चित्रकलेचे साहित्य भेटस्वरूपात देण्यात आले. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी आणि त्यांच्यातील गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
हेही वाचा
एमआयटीच्या ‘सायफारी ५.०’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० संस्थांतील ८७८ विद्यार्थ्यांचा सहभाग
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन सहायक प्राध्यापिका सौ. मोनिका उगले आणि सौ. कविता सांडभोर यांनी केले. हा उपक्रम विभागप्रमुख डॉ. संगीता बोर्डे व महाविद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. बी. बी. वाफारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवी ऊर्जा मिळाली असून, महाविद्यालय व परिसरातील शाळांमधील शैक्षणिक व सामाजिक स्नेहबंध अधिक दृढ झाले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




